गडचिरोली : ट्विटरवर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी पुणे आणि नागपूर येथील दोन युवकांना करण्यात आलेली अटक बेकायदेशीर ठरवून प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन्ही युवकांची जामिनावर सुटका केली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर विविध राजकीय नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. समाज माध्यमावर आक्षेपार्ह व वादग्रस्त मजकूर पोस्ट करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात ३१ मे २०२३ रोजी दोन ‘ट्विटर हँडलर’वर गुन्हा झाला होता.
दरम्यान, पोलीसांनी तपास करून आदित्य चव्हाण व मनोज पिंपळे या दोन युवकांना पुणे आणि नागपूर येथून २१ जून रोजी अटक केली होती. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी झालेल्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी अटकेची कारवाई करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता युवकांना ताब्यात घेतले, असे निरक्षण नोंदवून न्यायालयाने दोन्ही युवकांना जामीन मंजूर केला. आरोपींतर्फे ॲड. संजय ठाकरे व जगदीश मेश्राम यांनी बाजू मांडली.
हेही वाचा >>> वादग्रस्त ‘पोस्ट’प्रकरणी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप, आव्हाड यांचा आरोप
न्यायालयात राजकीय नेत्यांची गर्दी
गडचिरोली पोलिसांनी अटक केलेले दोन्ही युवक एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने मुंबई आणि गडचिरोलीतील काही राजकीय नेत्यांनी जिल्हा न्यायालयात गर्दी केली होती. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले आहे.