नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने इंदूर-नागपूर वंदे भारत एक्प्रेसच्या नागपूर स्थानकावरील आगमन आणि प्रस्थान वेळांमध्ये बदल केला आहे. रेल्वे प्रशाससाने गेल्या आठवड्यात नागपूर-इंदूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेससाठी (गाडी क्रमांक २०९११/२०९१२) भोपाळ विभागातील नर्मदापुरम स्थानकावर प्रायोगिक थांबा मंजूर केला होता. आता नागपूर स्थानकावर येण्याच्या आणि सुटण्याच्या वेळांमध्ये बदल केला आहे. नागपूर ते इंदूर वंदे भारत एक्स्प्रेस भोपाळ आणि उज्जैन मार्ग धावते.
नागपूर स्थानकावरील सुधारित वेळेनुसार इंदूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस दुपारी २.३० वाजता ऐवजी दुपारी २.३५ वाजता नागपुरात येईल. नागपूर स्थानकांवरून ही गाडी दुपारी ३.२० निघते. या वेळेत कोणताही बदल झालेला नाही.
गाडी क्रमांक २०९११ इंदूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस नर्मदापुरम येथे सकाळी १०.२२ वाजता येईल आणि १०.२३ मिनिटांनी निघेल. गाडी क्रमांक ९१२ नागपूर-इंदूर वंदे भारत एक्सप्रेस नर्मदापुरम येथे रात्री ७.२२ वाजता येईल आण येथून रात्री ७.२३ वाजता निघेल. हा थांबा ३१ जानेवारी २०२५ पासून सुरू झाला असून पुढील सूचनेपर्यंत सुरू राहील, असे रेल्वेच्या नागपूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या नागपुरातून तीन वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. नागपूर ते इंदूर वंदे भारत एक्स्प्रेस, नागपूर ते सिकंदराबाद आणि नागपूर ते बिलासपूर एक्स्प्रेसचा समावेश आहे. नागपूरत ते इंदूर वंदे भारत एक्स्प्रेसला बैतुल, इटारसी, निर्मदापुरम, भोपाळ आणि उजैन असे थांबे आहेत. या गाडीला ६३६ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सुमारे सव्वा आठ तास लागतात.
नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसला ५७५ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ७ तास १५ मिनिटे लागतात. ही गाडी नागपूरहून पहाटे ५ ला निघते आणि दुपारी सिकंदराबादला १२.१५ ला पोहोचते. १३० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी ही गाडी नागपूरहून निघाल्यानंतर सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, रामागुंडम आणि काझीपेठ स्थानकांवर थांबते. त्यानंतर थेट सिकंदराबादला जाते. वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबादहून दुपारी १ वाजता निघते आणि नागपूरला रात्री ८.२० वाजता पोहोचते.
नागपूर- बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला ४१२ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ५ तास २० मिनिटे लागतात. या गाडीला गोंदिया, डोंगरगड, राजनांदगाव, दुर्ग आणि रायपूर येथे थांबे आहेत. नागपूर येथून तीन वंदे भारत एक्स्प्रेस आहेत. नागपूर-इंदूर, नागपूर-बिलासपूर आणि नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू आहेत.