डोक्यावर भगवा फेटा.. मुखी गणरायाचा नामघोष.. अशा मंगलमय वातावरणात उपराजधानीत गणरायांचे आगमन झाले. भाविकांच्या या जल्लोषात पाऊसही सहभागी झाला. सकाळी थोडी धावपळ जरुर झाली, पण घरगुती गणरायाच्या स्थापनेचा मुहूर्त साधलाच गेला.

गणरायांच्या स्थापनेचा मुहूर्त सकाळचाच होता. त्यामुळे अनेक घरांमध्ये सकाळपासूनच आगमन सुरू झाले. काही सार्वजनिक मंडळांनी हा मुहूर्त साधण्यासाठी शनिवारी आणि रविवारीच वाजतगाजत गणरायांच्या मूर्ती आणल्या. आज सकाळपासूनच संततधार सुरू होती. तरीही शहरातील मूर्तिकारांचा गड असणाऱ्या चितारओळीत भाविकांची प्रचंड गर्दी होती. पुरुष आणि युवाच नाही तर महिला, युवती आणि लहान मुलेही यात सहभागी झाली. बाजारपेठ आणि चितारओळ गर्दीने फुलली होती. मूर्ती नेण्यासाठी सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. गर्दीमुळे मोठय़ा मूर्ती बाहेर काढताना अनेक अडचणी येत होत्या. शहरात प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. वाडी परिसरातही ढोलताशांच्या गजरात, मराठमोळ्या पद्धतीने मिरवणूक काढून गणरायांचे स्वागत करण्यात आले. शहरातील धरमपेठ, खामला या मार्गावरही असाच उत्साह होता. महाविद्यालयीन तरुणाईदेखील  गणरायांना घेऊन जाण्यासाठी चितारओळीत आली होती. पाणी वाचवण्याचा संदेश देत, कमीत कमी कचरा करून आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार त्यांनी केला. रात्री उशिरापर्यंत गणरायाचे आगमन सुरूच होते. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शहरात चोख पोलीस बंदोबस्त होता.

नागपूरचा राजा शनिवारीच आला

मोठय़ा गणेश मंडळाच्या अनेक गणेशमूर्ती शनिवारी आणि रविवारी नेण्यात आल्या. रेशीमबागेतील नागपूरचा राजा शहरातील मानाचा गणपती आहे. त्याचे यंदाचे २४वे वर्ष असून दरवर्षी या राजाला सोन्याचे अलंकार चढवले जातात. या गणरायांचे आगमन शनिवारीच झाले. महालातील संती गणेशोत्सव मंडळासह विविध भागातील गणेशमूर्ती रविवारी दुपारीच वाजतगाजत नेण्यात आल्या. हिलटॉप येथील आमदार प्रकाश गजभिये यांच्या मंडळाची मूर्ती त्याच्या उंचीसाठी ओळखली जाते. या सर्वात उंच गणपतीचे आगमन मात्र सोमवारी झाले. मोदी नं. दोनचा गणपतीही सोमवारीच आणण्यात आला.

टेकडी गणपतीला गर्दी

विदर्भातील अष्टविनायकांपैकी पहिला गणपती म्हणून शहरातील टेकडी गणपतीचा उल्लेख होतो. गणेश चतुर्थीनिमित्त सकाळपासूनच याठिकाणी भाविकांची गर्दी होती. आजपासून पुढचे दहा दिवस येथे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

देश ‘नॉलेज पॉवर’ होऊ दे – गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरीही गणरायांची प्रतिष्ठापना झाली. त्यांनी सहकुटुंब गणरायांची पूजा केली. गणपती विद्य्ोची देवता आहे. देशात ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा आणि आपल्या देशाला ‘नॉलेज पॉवर’ म्हणून जगात मान्यता मिळावी, अशी त्यांनी गणरायांच्या चरणी प्रार्थना केली.

Story img Loader