यवतमाळ : तालुक्यातील एका अवैध दारू विक्रेत्याच्या घरी धाड टाकून पोलिसांनी शोधमोहीम राबविली. याच दरम्यान दारू विक्रेत्याच्या छातीत दुखायला लागले. उपचारासाठी यवतमाळ येथे जात असताना त्याचा मृत्यू झाला. मांगीलाल रतन जाधव, (३५) रा. अंतरगाव, ता आर्णी असे मृताचे नाव आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत मांगीलालच्या नातेवाईकांनी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन केले. या घटनेमुळे आर्णी येथे तणाव निर्माण झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी मांगीलाल जाधव याचा चुलत भाऊ संतोष सोमला जाधव (४५), रा. अंतरगाव याने आणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी धाकधपट केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनुसार, आर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ऋषीकेश इंगळे व इतर तीन कर्मचारी अशा चार जण बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता अंतरगाव येथे मांगीलाल जाधव याच्याकडे अवैध दारूची शोधमोहीम राबविण्यासाठी गेले. त्याच्या घरात शोध घेवूनही काहीच हाती न लागल्याने पोलिसांनी शेतातील गोठ्यात अवैध दारूचा शोध घेतला. तेथे दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या. पोलीस धाकदपट करत असताना मांगीलाल याने आपल्या छातीत दुखत असल्याचे सांगितले.

पोलिसांनी त्याला मित्रासोबत आर्णी येथे डॉ. जैन यांच्या दवाखान्यात पाठवले. तेथे त्याचा इसीजी काढल्यानंतर प्रकृती धोकादायक असल्याने डॉक्टरांनी त्याला यवतमाळला रेफर केले. तो मित्राच्या कारने यवतमाळकडे निघाला. मात्र, आर्णीलगत जवळा या गावी त्याचा वाहनातच मृत्यू झाला. चालकाने वाहन परत आर्णी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. डॉक्टरांनी मांगीलाल यास तपासून मृत घोषित केले.

मांगीलालचे नातेवाईक, समर्थक व अंतरगाव येथील नागरिक आर्णीत ग्रामीण रूग्णालयासमोर जमले. पोलिसांनी घराची झडती घेतल्याने तो दबावात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला मारहाण केली. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रात्री सोडअकराच्या सुमारास रूग्णालयासमोर टायर जाळून जबाबदार पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जमावाने केली. घटनेची माहिती मिळताच यवतमाळचे अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप हे रात्री १२.३० वाजता आर्णी येथे पोहोचले. त्यांनी नातेवाईक व नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर शवविच्छेदन अहवालात मांगीलालचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे आढळल्यास दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्याकडे सोपविण्यात आला. दरम्यान, ‘या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोठडीतील मृत्यूचा आरोप असल्याने प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. तालुका न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर इन कॅमेरा पंचनामा झाला असून, शवविच्छेदनही डॉक्टरांच्या पॅनलच्या उपस्थितीत इन कॅमेरा करण्यात आले’, असे अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

सीआडीकडून चौकशी

अमरावती येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड व उपअधीक्षक जयश्री देशमुख यांनी आज गुरूवारी दुपारी आर्णी येथे भेट दिली. मृताचे नातेवाईक, मारहाणीचा आरोप असलेले पोलीस कर्मचारी यांच्याशी चर्चा केली. यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मांगीलाल जाधव याच्या मृतदेहाचे ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात आले. हा अहवाल आल्यानंतरच त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट होणार आहे. या घटनेने आर्णी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर उलटसुलट चर्चा सुरू आहे.