कधी कधी परिस्थिती माणसाला हतबल बनवते. आयुष्यभर जोपासलेली जीवननिष्ठा गळून पडायला अनेकदा ही परिस्थितीच कारणीभूत ठरते. जन्मभर देवाला शिव्या देणारी माणसे मरणाच्या दारात उभी ठाकली की, देवाचा धावा करताना दिसतात. अश्रध्द माणसे श्रध्देकडे झुकू लागतात. कधी कधी तर विज्ञाननिष्ठही आता देवच काय ते करेल, असे बोलताना दिसतात. आपल्या जीवननिष्ठा सांभाळत कठीण परिस्थितीला धर्याने तोंड देणारी माणसे फार कमी असतात. अशा निष्ठा सांभाळण्यासाठी जीवनभर केलेला संघर्षच त्यांना कठीण काळात धर्य देत असतो. याच धर्याच्या बळावर ते परिस्थितीचा सामना करतात आणि तावून सुलाखून बाहेर पडतात. मात्र, त्यांच्यावर प्रेम करणारेच जर परिस्थितीशरण जात असतील, त्यांच्या निष्ठांना ठेच पोहोचेल, असे वागत असतील तर काय?, हा प्रश्न सध्या विदर्भातील एका मनस्वी कलावंताला सतावतो आहे.
नवरगावचा सदानंद बोरकर हे झाडीपट्टी रंगभूमीवरचे एक मोठे नाव. चित्रकार, लेखक, कलावंत व अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कार्यातील एक बिनीचा शिलेदार, अशी त्याची बहुआयामी ओळख आहे. हा सदानंद सध्या जीवघेण्या आजारातून हळूहळू बरा होत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावर वास्तववादी नाटक सादर करून सार्क राष्ट्र संघटनेची वाहवा मिळवणारा हा कलावंत काही महिन्यापूर्वी मरणपंथाला खिळला होता. एकाच वेळी अनेक आजारांनी अतिक्रमण केल्याने कोमात गेलेला, एकेक अवयव निकामी होत गेल्याने डॉक्टरांनी जगण्याची आशा सोडलेला सदानंद आता पूर्वपदावर येत आहे. त्याच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. या साऱ्यांनी तो बरा व्हावा म्हणून घेतलेला अंधश्रध्देचा आधार सध्या सदानंदला अस्वस्थ करून सोडतो आहे. पूर्व विदर्भात अंधश्रध्दा मोठय़ा प्रमाणावर आहे. अनेक शिकलेले लोक त्याच्या आहारी जाताना अनेकांनी बघितले आहेत. सदानंद गेली अनेक वर्ष याविरोधात काम करीत आहे. २००४ मध्ये नवरगावजवळच कार्यरत असलेल्या एका शिक्षिकेने तिच्या शिक्षक पतीला अशाच अंधश्रध्देतून ठार मारले. ते प्रकरण खूप गाजले. यामुळे अस्वस्थ झालेल्या सदानंदने मग याच घटनेवर आधारित एक नाटक लिहिले. ‘माझं कुंकू मीच पुसलं’ या नावाच्या या नाटकाचे दिडशे प्रयोग पूर्ण विदर्भात झाले. लोकांच्या मनात खोलवर दडून असलेले अंधश्रध्देचे भूत उतरावे हाच उद्देश यामागे होता. या नाटकाला लाभलेला उदंड प्रतिसाद सदानंदला व विशेषत: त्याच्यात दडलेल्या अंनिसच्या कार्यकर्त्यांला सुखावून गेला. मात्र, हाच सदानंद आजारी असताना त्याच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी केलेले उपद्व्याप बघून तो आता चक्रावून गेला आहे.
सदानंद आजारी असताना एक वेळ अशी आली की, तो वाचणेच अशक्य आहे. त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर व सदानंदची इच्छाशक्ती हेच या वेळेवर मात करू शकत होते. मात्र, त्याच्या चाहत्यांनी वेगळाच मार्ग चोखाळला. नवरगावातूनच सदानंदच्या मृत्यूची अफवा उडवून देण्यात आली. सदानंद गेला, असे लघुसंदेश भराभर फिरू लागले आणि अनेकांच्या काळजात धस्स झाले. नंतर कळले की, ती अफवा होती. आता या अफवेमागचे कारण कळल्यावर सदानंदला हसावे की रडावे, हेच समजेनासे झाले आहे. पूर्व विदर्भातील अनेक गावात मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीच्या मरणाची अफवा पसरवली की, तो हमखास जगतो, अशी अंधश्रध्दा आहे. यातून ही अफवा सदानंदच्या वाटय़ाला आली. आता तो बरा होत आहे, हे बघून ही अफवा पसरवणारेच त्याला आनंदाने भेटून केलेल्या कृतीचे समर्थन करीत आहेत. हे सांगणाऱ्यांच्या मनात सदानंदविषयी नितांत प्रेम आहे, यात वाद नाही. केवळ प्रेमापोटी त्यांनी हे केले हे सुध्दा एकदाचे मान्य, पण हा सारा प्रकार आयुष्यभर अशा अंधश्रध्दांच्या विरोधात लढणाऱ्या सदानंदला वेदना देणारा ठरला आहे. सदानंदचे चाहते एवढय़ावरच थांबले नाहीत, तर काहींनी नवस बोलले, काहींनी १२१ नारळ कुठल्याशा देवळात जाऊन फोडले, काहींनी अंगात येणाऱ्या देवीजवळ जाऊन सदानंदचे काय, असे प्रश्न विचारले, त्यासाठी पैसे खर्च केले, काहींनी अमावस्येच्या पूजा मांडल्या.
हे सारे ऐकून सदानंद पार व्यथित झालेला आहे. तो रुग्णालयात असताना सुध्दा त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी एका क्षणी आता सारे काही देवावर, असे उद्गार काढल्याचे सदानंदला आता सांगितले जात आहे. अनेकदा डॉक्टर असे बोलून जातात, पण सदानंदला ही थिएरीच मान्य नाही. उपचार व इच्छाशक्ती हेच माझ्या जिवंत असण्याचे एकमेव कारण आहे, असे तो ठामपणे बोलून दाखवतो. मग या चाहत्यांचे काय?, असा प्रश्न त्याला पडतो. कुणी कुणासाठी चांगल्या हेतूने प्रार्थना करत असेल तर त्यात वावगे काहीच नाही.
शेवटी श्रध्दा हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे. मात्र, अलीकडे ही श्रध्दा पायरी ओलांडू लागली आहे. तिचा प्रवास अंधश्रध्देकडे होऊ लागला आहे. केवळ प्रेमापोटी जरी हे होत असेल तरी ते वाईट आहे, अशी बोच सदानंदच्या मनात सलत आहे. पूर्व विदर्भातील अनेक गावात आजही अंधश्रध्देतून अनेक अघोरी प्रकार घडतात. यातून कुटुंबावर बहिष्काराच्या बातम्या तर नेहमीच येत असतात. जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण केली जाते, हत्या घडतात. या साऱ्यांविरुध्द लढताना अध्रे आयुष्य निघून गेलेल्या सदानंदला आता वैयक्तिक पातळीवर आलेला हा अनुभव आपलाच पराभव आहे, असे वाटू लागले आहे.
सोबतच अंधश्रध्दा निर्मूलनासाठी आजवर आपण केलेले काम किती तोकडे होते व अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे, याचीही जाणीव सदानंदला या आजाराने नव्याने करून दिली आहे.
– देवेंद्र गावंडे