स्वयंसेवींची फटाक्यांविरुद्ध देशव्यापी मोहीम
फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा परिणाम पशुपक्ष्यांवर होतो, हे माहिती असूनसुद्धा दिवाळीच्या आनंदात फटाके फोडताना मर्यादेचे भान ठेवले जात नाही. परिणामी, दरवर्षी हजारो पक्ष्यांसह कीटकांचा अकाली मृत्यू होत आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या याच काळात मोठय़ा प्रमाणावर पक्ष्यांचे स्थलांतरण घडून येते. त्यामुळे पक्षीजगतात काम करणाऱ्या स्वयंसेवी आणि स्वयंसेवी संस्थांनी समाजमाध्यमावरून फटाक्याविरुद्ध देशव्यापी मोहीम उघडली आहे.
दिवाळीच्या दिवसात सायंकाळी सहानंतर ध्वनिप्रदूषणाचा स्तर सामान्य स्तरापेक्षा सुमारे ४५ ते ५० टक्क्यांनी वाढतो. व्यावसायिक भागात ६५ डेसिबल्स, औद्योगिक भागात ७५ ते ८५ डेसिबल आणि निवासी भागात ५५ डेसिबलची ध्वनिमर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र, याचे पालन कुठेच होत नाही. प्रकाश फेकणाऱ्या कीटकामुळे पक्ष्यांच्या डोळ्यांवर अत्यंत विपरीत परिणाम होतो. अतितीव्र प्रकाशामुळे पक्ष्यांना आंधळेपणा येतो आणि अंधारात चाचपडल्यामुळे भिंतीवर आदळूनही त्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. फटाक्यांच्या मोठय़ा आवाजाने पक्षी खाली पडून जखमी आणि मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. रॉकेट्समुळे आणि वर जाऊन फुटणाऱ्या फटाक्यांमुळे पक्ष्यांचा अधिवास म्हणजेच झाडावरील त्यांची घरटी जळतात. पशुपक्ष्यांची ध्वनी ऐकण्याची क्षमता मानवापेक्षा सात पटीने अधिक असते. या आवाजामुळे पक्ष्यांच्या कानाच्या नसा तुटण्याची दाट शक्यता असते. फटाक्यांचा सर्वाधिक परिणाम चिमण्यांवर होतो. एकटय़ा चेन्नईत दरवर्षी दिवाळीच्या दिवसात १३ टक्के चिमण्यांचा मृत्यू ध्वनिप्रदूषणामुळे होत असल्याचे समोर आले आहे.
पक्ष्यांमध्ये चिमणी या प्राण्यांवर जेवढा अधिक परिणाम फटाक्यांचा होतो, तेवढाच परिणाम प्राण्यांमध्ये मांजरीवर अधिक होतो. ध्वनीची पातळी वाढत राहिल्यास त्या भागातील प्राणी अधिवासाची जागा बदलतात. फटाके पाण्यात पडल्यानंतर जलचरांवरही तेवढाच विपरीत परिणाम होतो. फटाक्यांमधील रसायनामुळे जलचरांचे मूत्रपिंड आणि यकृत निकामी होण्याची शक्यता असते. एका अभ्यासानुसार समुद्रातील कासवसुद्धा तीव्र प्रकाशाकडे आकर्षित होऊन पाण्याबाहेर पडतात आणि रस्त्यावर आल्यामुळे वाहनांखाली येऊन त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. पशुपक्ष्यांवर होणाऱ्या या परिणामामुळेच आता स्वयंसेवी व त्यांच्या संस्थांनी समाजमाध्यमांवरून गेल्या काही वर्षांपासून जनजागृती सुरू केली आहे. त्याचा फार मोठा परिणाम झालेला नसला तरीही थोडय़ाफार प्रमाणात परिणाम होत आहे.
पशू, पक्ष्यांसाठी त्यांची फटाकेमुक्त दिवाळी
भारतात तामिळनाडूतील वेल्लोड पक्षी अभयारण्यातील ७५० कुटुंबीय गेल्या १५ वर्षांंपासून केवळ पशू आणि पक्ष्यांसाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करत आहेत. ऑक्टोबर ते जानेवारी हा पक्ष्यांच्या स्थलांतरणाचा काळ असल्यामुळे विविध पक्षी या अभयारण्यात येतात. एकदा पक्ष्यांनी हे अभयारण्य सोडले तर ते पुन्हा येणार नाहीत, म्हणून आठ गावातील या कुटुंबांनी हा निर्णय घेतला. दिवाळीत गावकरी पक्षी अभयारण्यात जाऊन पक्ष्यांना धान्य टाकतात.