महाभारतातील एक युध्दाचा प्रसंग. कर्ण व अर्जून यांच्यात सुरू असलेल्या तुंबळ युध्दात अचानक कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत फसते. हे बघून अर्जून कर्णावर वार करायचा थांबतो. शस्त्र खाली ठेवून फसलेल्या रथाचे चाक काढणाऱ्या कर्णाशी युध्द खेळणे अधर्म आहे, असे अर्जून म्हणतो. त्याचा सारथी असलेला कृष्ण मात्र कर्णावर वार कर, असे अर्जूनाला सांगतो. हे बघून कर्ण कृष्णाला अधर्माची आठवण करून देतो. तेव्हा द्रौपदीच्या वस्त्रहरणासह अनेक वेळा कर्ण कसा थांबला होता, याचे दाखले देत तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?, असा प्रश्न कृष्ण कर्णाला विचारतो. गडचिरोलीच्या दुर्गम भागात गेल्या अनेक वर्षांंपासून शिक्षण व आरोग्यक्षेत्रात सेवा देणाऱ्या विलास मनोहरांना आज हाच प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. त्याला कारण ठरले आहे मनोहरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र. हे पत्र लिहायला कारणीभूत ठरलेली घटना भामरागडजवळ असलेल्या नेलगोंडाच्या शाळेतील आहे. मनोहरांच्या सक्रीय सहभागातून सुरू झालेल्या या शाळेत नक्षलवाद्यांच्या शोधात असलेले पोलीस आले व त्यांनी संशयावरून शाळेची उभारणी करणाऱ्या गवंडय़ाला मारहाण केली. विद्यार्थ्यांसमोर घडलेला हा प्रकार योग्य नाही, बंदुका घेऊन शाळेत जाणे बरोबर नाही, असा मनोहरांच्या पत्राचा सूर आहे. मुख्यमंत्र्यानी याची दखल घेत पोलिसांचा शाळा परिसरातील हस्तक्षेप थांबवावा, अशी विनंती या पत्रात आहे.
सध्या हे पत्र समाजमाध्यमात फिरत आहे व त्यावर चर्चाही झडत आहे. मात्र, मनोहरांच्या या कृतीने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत व होत आहेत. नक्षलवाद्यांच्या वावरामुळे गडचिरोलीत घडणारा हिंसाचार ही काही नवीन बाब नाही. नक्षलवादी व पोलीस यांच्यात सुरू असलेल्या या युध्दाची झळ अनेकांना बसली आहे. त्यात स्त्रिया व मुलेही आली. नक्षलवादी व पोलीस या दोहोंकडून होणाऱ्या हिंसाचाराची तुलना केली, तर त्यात नक्षलवादी कित्येक पटीने समोर आहेत. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात आजवर शेकडो आदिवासींचे बळी गेले आहेत. यातील क्रौर्य साऱ्यांना दिसावे म्हणून नक्षलवादी गावकऱ्यांना गोळा करून त्यांच्या समोर एखाद्याला ठार करतात. या गर्दीत अनेक विद्यार्थ्यांंना नाईलाजाने सामील व्हावे लागते. पोलिसांच्या शाळा इमारतीच्या वापरावर आक्षेप घेणारे नक्षलवादी बिनदिक्कतपणे शाळांमध्ये जातात, विद्यार्थ्यांंना चळवळीची गाणी म्हणायला लावतात, त्यांच्यासमोर तिरंगा जाळतात, पायदळी तुडवतात, विद्याथ्यार्ंसाठी असलेले अन्न खातात, चळवळीत सामील होण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकतात व प्रसंगी जबरीने पळवूनही नेतात. नक्षलवाद्यांच्या भीतीने गडचिरोलीतील अनेक हुशार विद्यार्थी दुर्गम भागात शिकत नाहीत. अनेकजण सुरक्षित ठिकाणी जाऊन शिक्षणाला प्राधान्य देतात. अर्धवट शिक्षण घेतलेले विद्यार्थी नक्षलवादी नेतील, या भीतीने स्थलांतर करतात. बाहेर पडेल ती कामे करतात. या भयावह परिस्थितीवर विलास मनोहर कधी भाष्य करताना वा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिताना कधी दिसले नाहीत. दुर्गम भागातील शाळांमधून नक्षलवाद्यांचा मुक्तसंचार सुरू असताना, त्यावर आक्षेप घ्यावा, असे मनोहरांना का वाटत नाही? बंदूक कुणाच्याही हातातील असो, त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम सारखाच असतो, हे मनोहरांना मान्य नाही का? मग पोलिसांच्या कृतीवर आक्षेप घेणारे मनोहर नक्षलवाद्यांच्या बाबतीत चूप का बसतात?
सध्या देशात निषेधाचा सोयीस्कर मार्ग स्वीकारणाऱ्यांची गर्दी झाली आहे. विषय वेगळा असला तरी मनोहरही त्या गर्दीत सामील झाले आहेत, असे खेदाने म्हणावे लागते. आक्षेपाचा हा सापेक्ष मार्ग एका सेवाव्रतीने स्वीकारावा, हे चांगले लक्षण कसे मानायचे? पोलिसांनी बंदुका घेऊन शाळेत जाण्याचे, गवंडय़ाला मारहाण करण्याचे समर्थन कुणी करणार नाही. मात्र, गडचिरोलीत सुरू असलेल्या युध्दाबाबत कायमचे मौन पाळायचे आणि स्वत:च्या शाळेवर प्रसंग गुदरला तर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायचे, हा स्वार्थीपण झाला. सेवेच्या क्षेत्रात इतकी वष्रे काढूनही असे वर्तन मनोहरांकडून घडत असेल तर समाजाने आशेने कुणाकडे बघायचे? हिंसेला प्राधान्य देणाऱ्या नक्षलवाद्यांनी सामान्य आदिवासींना ठार मारू नये, अशी मानवतावादी भूमिका सुध्दा मनोहरांनी कधी घेतल्याचे ऐकीवात नाही. मनोहर जेथे राहतात त्याच हेमलकस्यात नक्षलवाद्यांनी अनेकांचे गळे चिरले. १४ एप्रिल २००५ ला स्वत:च्या आजारी मुलाला उपचारासाठी घेऊन आलेल्या नारगुंडाच्या लालसू पुंगाटीला नक्षलवाद्यांनी सकाळी आठ वाजता हेमलकस्यात ठार मारले. डोळ्यासमोर झालेला हा हिंसाचार मनोहरांना किमान नक्षलवाद्यांना खुले पत्र लिहिण्यासाठी उद्युक्त करू शकला नाही. लाहेरीच्या आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींना नक्षलवाद्यांनी चक्क शाळेतून पळवून नेले तेव्हाही मनोहरांना बोलावेसे वाटले नाही आणि आता त्यांच्या शाळेत पोलीस आल्याचे त्यांना खटकते, हे पटणारे नाही. मनोहर दुर्गम भागात राहून सेवा देत आहेत. नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात राहून त्यांच्याविरुध्द बोलणे कठीण आहे. शेवटी भूमिकेपेक्षा सेवा महत्त्वाची. ही पाश्र्वभूमी साऱ्यांना ठावूक असल्यामुळे मनोहरच काय, पण गडचिरोलीत सेवेचे काम करणाऱ्या प्रत्येक आदरणीयांच्या मौनावर आजवर कुणी कधी आक्षेप घेतला नाही वा घेण्याचे धाडस केले नाही. या सेवेकऱ्यांना हिंसेविरुध्द बोलायला लावणे म्हणजे रेडक्रॉसला युध्दात भाग घ्यायला लावण्यासारखे, असा युक्तीवाद आजवर अनेकांनी केला व साऱ्यांना तो मान्यही होता. त्यांची ही अडचण समजून घेत त्यांच्या विपरीत परीस्थितीतील सेवाकार्याकडे सहानुभूतीने बघितले गेले. मनोहरांनी केवळ एक खुले पत्र लिहिल्यामुळे त्यांच्या सेवेचे मोल यत्किंचितही कमी होणार नाही, हे खरे. तरीही भूमिका घेण्याचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा डावा, उजवा, असे करता येत नाही, हे मनोहरांना कोण समजावून सांगणार? गडचिरोलीतील हिंसाचारामुळे आदिवासींची एक पिढीच गारद झाली आहे. बालमनावर हिंसेचे ओरखडे उमटून अनेकांचे आयुष्य बरबाद झाले आहे. भूमिका घेताना या साऱ्या संदर्भाचा विचार मनोहरांनी केला नसेल का?, असा प्रश्न अनेक विचारीमनांना सध्या सतावत आहे. किमान शाळांना तरी या हिंसाचारापासून दूर ठेवा, असे आवाहन मनोहरांनी पोलिसांप्रमाणेच नक्षलवाद्यांनाही केले असते तरच त्यांच्या भूमिकेचे वर्तुळ पूर्ण झाले असते व तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? असा प्रश्न विचारण्याची वेळ कुणावर आलीही नसती.
– देवेंद्र गावंडे