पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा कायम असल्याने महिलांच्या बुद्धय़ांकाविषयी फार बोलले जात नाही. अनेकजण यावर शांत राहणेच पसंत करतात, पण गेल्या शंभर वर्षांचा विचार केला तर पुरुषांच्या तुलनेत महिलांचा बुद्धय़ांक अतिशय जलद गतीने वाढत आहे. साधारण बुद्धिमत्ता असलेल्या स्त्रिया सुद्धा पुरुषांना मागे टाकतात हे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. या संशोधनावर बोळा फिरवण्याचे काम केल्याबद्दल नागपूरचे पोलीस आयुक्त शारदाप्रसाद यादव यांचे अभिनंदनच केले पाहिजे. त्यांनी महिलांच्या बुद्धय़ांकावर संशय घेऊन पुरुषप्रधान संस्कृतीचा जो परिचय दिला त्याला तोड नाही. माणूस शिकला की सुसंस्कृत होतो असे म्हणतात. त्याही पुढे जात शिक्षित माणूस शासकीय सेवेत आला की अनुभवसमृद्ध होतो असेही म्हणतात. अनुभवाने येणारे शहाणपण सभ्यतेकडे वाटचाल करणारे असते असेही बोलले जाते. या साऱ्या वक्तव्यांना छेद देणारे वाक्य यादव बोलून गेले आणि आपली मानसिकता कशी आहे याचे दर्शन त्यांनी सर्व पोलीस दलाला करून दिले. पोलीस म्हटले की शिस्त आली. ही शिस्त इतकी कडक असते की साहेबांनी पश्चिमेकडून सूर्य उगवतो म्हटले तरी कनिष्ठाला ‘हो सर’ म्हणावे लागते. त्यामुळे यादवांनी महिला पोलिसांच्या बुद्धय़ांकाचे वाभाडे काढले तरी हे दल व त्यात काम करणाऱ्या महिला शिपाई व अधिकारी यांना शांतच राहावे लागले. बाहेर मात्र मोठा गदारोळ उठला. अनेक महिला संघटनांनी यावर आक्षेप घेतला. आता यादव राजकारण्यांप्रमाणे मी तसे बोललोच नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला असे म्हणत स्वत:च्या चुकीचे खापर माध्यमांवर फोडत आहेत. मूळात पत्रकारांच्या समोर यादव जे बोलले त्याची चित्रफितच उपलब्ध आहे. पोलीस भरतीतील लेखी परीक्षेत महिला शिपायांना पर्यवेक्षक म्हणून नेमण्याची कारणे सांगताना त्यांनी त्यांचा बुद्धय़ांक कमी असतो म्हणून त्या उमेदवाराला परत करू शकत नाहीत व परीक्षा सुरळीत पार पडते हे यादव बोलले. परीक्षेत गैरप्रकार होऊ नये या चांगल्या हेतूने त्यांनी हा निर्णय घेतला असेलही पण त्यासाठी महिलांचा बुद्धय़ांक कमी आहे हे कारण यादव गृहीत धरत असतील तर त्यांची मानसिकताच स्त्रीविरोधी आहे हे स्पष्ट होते. आज सर्वच क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. प्रशासकीय पातळीवर सुद्धा महिलांना जाणीवपूर्वक संधी देण्याचे काम सुरू आहे. उच्च पदावर बसलेल्या यादवांची मानसिकता बघितली तर ही संधी व हे उपक्रम केवळ दाखवण्यासाठी तर नाही ना असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. खुद्द पोलीस दलात अलीकडच्या काही वर्षांत महिलांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. अनेक महिला अधिकाऱ्यांनी या संधीचे सोने केले आहे. फार दूर जाण्याची गरज नाही. सध्या राज्यभर गाजत असलेले डब्बा ट्रेडिंगचे प्रकरण यादवांच्या हाताखाली काम करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यानेच शोधून काढले. या कामगिरीचे कौतुक खुद्द मुख्यमंत्र्यांनी केले असताना यादव महिलांच्या बुद्धिमत्तेवर संशय व्यक्त करत असतील तर यापेक्षा दुर्दैवी बाब दुसरी कोणती असूच शकत नाही. आज महिलांनी सर्वच क्षेत्रात प्रगती केली असली तरी पुरुषांना बुद्धिमत्ता सिद्ध करावी लागत नाही, महिलांना ती करावी लागते अशी मानसिकता जोपासणारा मोठा वर्ग समाजात आहे. पुरुष जात्याच बुद्धिमान असतात असा गैरसमज समाजात खोलवर रुजला आहे. ही मानसिकता, हे गैरसमज दूर करायचे असतील तर पुरुषप्रधान संस्कृतीच्या विळख्यातून प्रत्येकाला जाणीवपूर्वक व कष्टाने बाहेर पडावे लागेल. तशी तयारी कुणीही दाखवत नाही, अगदी वरिष्ठ पदावरचे लोक सुद्धा! हे या बुद्धय़ांक प्रकरणाने दाखवून दिले आहे. यादव हे तसे चांगले अधिकारी आहेत. त्यांची नागपुरातील कामगिरीही उत्तम म्हणावी अशीच राहिली आहे. त्यांच्यासारख्या अधिकाऱ्याकडून असे वक्तव्य होणे म्हणूनच जास्त क्लेशदायी आहे. यादवांच्या मनात महिलांविषयी अपार आदर असता तर त्यांनी पटकन दिलगिरी व्यक्त केली असती पण त्यांनी खुलासा करताना माध्यमांनाच बेजबाबदार ठरवले. इथेही त्यांचा प्रशासकीय अहंम् आडवा आला. हा अहंम् प्रशासकीय सेवेची पार वाट लावत आहे. अधिकाऱ्यांच्या या अहंम्मुळे अनेक कामे मार्गी लागत नाहीत हा अनुभव सार्वत्रिक आहे. यादवांनी दिलगिरीकडे न वळता महिलांविषयी आदर व्यक्त केला पण माझी चूक नाही हा त्यांचा पवित्रा कायम राहिला. यादव तसे वादात अडकणारे अधिकारी नाहीत. आपण भले व आपले काम भले असाच त्यांचा प्रवास राहिला आहे पण कधी कधी माणूस चुकतो. अशावेळी क्षमाशीलता अंगी असणे केव्हाही चांगले असते हे त्यांना कोण सांगणार? नागपूर पोलीस दलाला संशयाच्या भोवऱ्यात उभ्या करणाऱ्या पोलीस भरतीतील नव्याने होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी महिला शिपायांनाच नेमू असेही यादवांनी जाहीर केले आहे. महिला कर्मचाऱ्यांवर माझा विश्वास आहे हे पुन्हा दर्शवून देण्यासाठी यादव हे करत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. मात्र प्रश्न विश्वासाचा नाही. या महिलांना काहीच येत नाही या मानसिकतेचा आहे. ती बदलावी लागेल तरच या कृतीकडे सरळ नजरेने बघता येईल. मानसशास्त्राचा विचार केला तर स्त्री असो वा पुरुष, त्यांच्या बुद्धय़ांकात भेदाभेद करता येत नाही. बुद्धय़ांकाचा लिंगभेदाशी कसलाही संबंध नाही. पुरुषप्रधान संस्कृतीचा जबर पगडा आपल्यावर असल्याने हे बुद्धय़ांक कमी अथवा जास्तचे भूत आपल्या डोक्यात शिरले आहे. ही भुते काढून फेकावी लागतील, तेव्हाच स्त्रीकडे समानतेच्या नजरेने बघता येईल. कधी तिला अबला ठरवायचे, कधी तिच्या बुद्धीवर संशय घ्यायचा हे प्रकार आता थांबायलाच हवेत. त्यासाठी जे सुसंस्कृत आहेत त्यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. तो न घेता प्रशासनातले वरिष्ठच जर असे वक्तव्य करू लागतील तर समाजाकडून अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. ज्यांना दिशा दाखवायची आहे त्यांचेच वारू असे भरकटू लागले तर ते अतिशय वाईट आहे.
– देवेंद्र गावंडे
devendra.gawande@expressindia.com