लोकसत्ता टीम
अकोला : राज्यातील पैदासक्षम गाय-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाचे प्रमाण केवळ १८ टक्के असल्याचे समोर आले आहे. राज्यात वंध्यत्व असलेल्या व माजावर न येणाऱ्या गाय-म्हशींची संख्या सुमारे ४० लाख आहे. राज्यातील दूध उत्पादन क्षमता वाढण्यासाठी गाय व म्हशींचे वंधत्व निवारण उपक्रम पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणार आहे.
वंधत्व हे गाय, म्हैस भाकड राहण्याचे प्रमुख कारण आहे. सर्वसाधारणपणे कालवडी २५० किलो व वासरे २७५ किलो शारीरिक वजन गाठल्यानंतर पहिला माज दर्शवतात. जनावरांमध्ये सलग तीन आठवडे वजनात घट दिसून आल्यास त्यांच्यात प्रजननाची कमतरता व वंधत्वाची बाधा आढळते. त्यामुळे जनावरांना रोज एक किलो पशुखाद्य, मुबलक हिरवा व वाळलेला चारा, मुक्तसंचार, व्यवस्थापनात व्यायम, रोज ५० ग्रॅम खनिजमिश्रण, जंतनाशके, भरपूर पाणी याचे नियोजन आवश्यक आहे, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
आणखी वाचा-‘अमृत संस्थे’ला वालीच नाही का? खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील युवकांच्या उन्नतीसाठी…
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात दुधाळ गाय-म्हशींची दूध उत्पादनक्षमता कमी आहे. त्यामुळे गावोगाव वंधत्व निवारण उपक्रम राबविला जाणार आहे. शेतकरी, पशुपालक यांच्याकडील गाय-म्हशींमध्ये उद्भवलेल्या वंध्यत्वाचे निवारण करण्यासाठी अभियानाला सुरुवात झाली. मोहिमेत गावोगावात गाय-म्हशींची तपासणी व उपचारावर मार्गदर्शन केले जाणार आहे, असे पशुसंवर्धन उपायुक्त जगदीश बुकतारे यांनी सांगितले.
तपासणीनंतर काही कमतरता आढळल्यास योग्य औषधोपचार आवश्यक असतात. गास-म्हशी व्याल्यानंतर ९० दिवसांच्या आत माजावर येऊन गाभण राहिल्यास त्यांच्यातील दोन वेतातील काळ कमी होण्यास मदत होते. गाय- म्हशी माजावर आल्यानंतर त्यांच्यामध्ये योग्यवेळी कृत्रिम रेतन न केल्यास जनावरांच्या दोन वेतांतील अंतर वाढणे, वर्षाला वासरू न मिळणे व खाद्यावरील खर्च होऊन पशुपालकाचे नुकसान होते. त्यामुळे यावर उपाययोजनेसाठी पशुपालकांनी अभियानात जनावरांवर उपचार करून घ्यावे, असे आवाहन डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले.
आणखी वाचा-हिवाळी अधिवेशन : विधानपरिषदेत आतापर्यंत १८०० वर प्रश्न; आजपासून लक्षवेधी स्वीकारणार
अभियानामध्ये पशुंचा आहार व स्वास्थ्य, तसेच पशुधनाची वंधत्व तपासणी करून निदान करण्यात येणार आहे. जंत, गोचिड, गोमाशा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुधनावर, तसेच गोठ्यामध्ये नियमितपणे औषधी फवारणी, तसेच गाय-म्हशींमध्ये नियमित कालांतराने जंतनाशकाचा वापर करण्यावर मार्गदर्शन केले जाईल, असे डॉ. बुकतारे यांनी सांगितले.