नागपूर : येत्या दहा दिवसांत वाघाच्या कृत्रिम स्थलांतरणाचा प्रकल्प मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनक्षेत्रातून पाच वाघांचे स्थलांतरण करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात दोन वाघ स्थलांतरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असून, तयारी अंतिम टप्प्यात आहे.

ब्रम्हपुरी येथील पाच वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित करण्यासाठी केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने १५ सप्टेंबर २०२२ ला मंजुरी दिली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात दोन वाघिणींना नोव्हेंबर २०२२ मध्ये स्थलांतरित करण्यात येणार होते. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्रम्हपुरी वनक्षेत्रात वाघांच्या अतिरिक्त संख्येमुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. त्यामुळे राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत येथील वाघांच्या स्थलांतरणाचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा – वर्धा : घुबड अपशकुनी? ते तर आमच्यासाठी…

तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी मे २०२२ मध्ये मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून स्थलांतरणाची परवानगी घेण्यात आली. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलम १२ (बीबी) अंतर्गत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने १५ सप्टेंबर २०२२ ला पाच मादी वाघांना रेडिओ कॉलर लावण्याची परवानगी दिली. तर राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीकडूनदेखील यासाठी मंजुरी मिळाली आहे. या सर्व मंजुरीनंतर नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाचे प्रशासन तयारीला लागले.

हेही वाचा – नागपूरकरांची मते जिंकण्यासाठी भाजप काय जादू करणार ?

डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांनी वाघिणींना सोडण्यात येणाऱ्या परिसराचा अभ्यास केला. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता व नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक जयरामे गौडा यांनी बुधवारी या व्याघ्रप्रकल्पाची पाहणी केली. दरम्यान, या दोन वाघिणींना थेट व्याघ्रप्रकल्पात सोडण्यात येणार असल्याने थोडा संभ्रम आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर विविध संरक्षित क्षेत्राचा अभ्यास करण्यात येईल आणि त्या ठिकाणीदेखील अतिरिक्त वाघांचे स्थलांतरण करण्यात येईल.

Story img Loader