कृत्रिम तलावातील पाणी रस्त्यावर
गणेशोत्सवादरम्यान गणपतीमूर्ती प्रतिष्ठापनेपासून तर विसर्जनापर्यंत पर्यावरणवाद्यांची मोठी फौज तयार होते, पण त्यांच्याच पर्यावरणप्रेमावर प्रश्नचिन्ह उभे राहावे, अशा काही गोष्टी या गणेशोत्सवात घडून येत आहेत. लोकांना एकीकडे कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन करायचे आणि त्याच कृत्रिम तलावातील पाणी विसर्जनानंतर रस्त्यावर सोडण्याचा प्रकार पर्यावरणवाद्यांनी सुरू केला आहे.
पर्यावरण हा विषय जागतिक पातळीवर चर्चिला जाणारा आणि अशावेळी पर्यावरणाशी संबंधित थोडे काम करून प्रसिद्धी मिळत असेल तर ती कुणाला नको असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत पर्यावरणवाद्यांची मोठी फौज तयार झाली आहे. गणेशोत्सवात त्यांच्या पर्यावरणप्रेमाला अधिक बहर येतो, कारण गणेशमूर्ती मातीची असावी की शाडूची, विसर्जन नैसर्गिक तलावात करायचे की कृत्रिम तलावात असे अनेक मुद्दे याच काळात उद्भवत असतात. मात्र, पर्यावरणप्रेम वाहवत गेल्यानंतर त्याचे काय परिणाम, दुष्परिणाम होतात याचा अनुभव सध्या नागपुरातील जनता घेत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पाण्याचे प्रदूषण होते म्हणून त्याला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला. तरीही बाजारात या मूर्ती दरवर्षी येतात. त्यावर उपाय म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीसाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले. यावर्षी नागपूर महापालिकेनेसुद्धा मोठय़ा प्रमाणावर त्यासाठी पाऊल उचलले. पर्यावरणवाद्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक भाविक गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करीत आहेत. मात्र, विसर्जनानंतर पाणी रस्त्यावर सोडण्याचा आणि भाविकांच्या श्रद्धेशी खेळण्याचा प्रकार पर्यावरणवाद्यांनी चालवल्याने त्यांच्या पर्यावरणप्रेमावर शंका उपस्थित होऊ लागली आहे.
शहरातील रामनगर परिसरात प्लायवूडपासून कार्पोलीन टाकून कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे. तब्बल ३० हजार लीटर पाणी साठवेल आणि सुमारे १५०० गणपर्ती विसर्जित करता येऊ शकतील, एवढा हा तलाव आहे. भाविकसुद्धा पर्यावरणाचा विचार करूनच त्यात गणेशमूर्तीचे विसर्जन करीत आहेत. मात्र, असे असताना विसर्जनानंतर त्यातील पाणी रस्त्यावर सोडण्यात येत असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कृत्रिम तलावात पाणी टाकण्यासाठी महापालिकांचे टँकर कामाला लागले आहेत. अशावेळी हे पाणी काढण्यासाठीसुद्धा पंप त्यांच्याकडे आहेत. त्याच्या सहाय्याने कृत्रिम तलावातील पाणी टँकरमध्ये भरून शहराच्या बाहेर लावलेल्या झाडांना देता येऊ शकते. यामुळे भाविकांची श्रद्धा जपण्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण अशा दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात. शहरातल्याच फुटाळा तलाव परिसरात हा समतोल साधला जात असताना रामनगरात त्याच्या विपरित परिस्थिती असल्याने, या पर्यावरणवाद्यांचे प्रेम बेगडी ठरण्याची शक्यता अधिक आहे.

Story img Loader