लोकसत्ता टीम
यवतमाळ : मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर अनेक शेतकरी आपल्या शेतात धूळ लागवड करतात.परंतु यंदा मात्र बियाणे उत्पादक कंपन्यांनी कपाशी बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला असल्याने शेतकरी गंडविल्या जात आहे. मोठे होलसेलर आणि कंपन्या अधिकचा फायदा घेण्याच्या नादात आहेत. छोट्या रिटेलरने बियाणे खरेदीसाठी ‘ऑन ऑफर’ दिल्यास त्यांना तत्काळ बियाणे उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे.
दरवर्षी जिल्ह्यात खरीप पिकांची लागवड सर्वाधिक क्षेत्रावर केली जाते. शेतकरी मशागतीच्या कामाला मोठ्या जोमाने लागला असून खत, बी बियाणे खरेदीची लगबगीत आहेत. परंतु बियाणे तुटवडा निर्माण झाल्याने पेरण्या लांबतील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असून कृषी विभाग मूग गिळून गप्प आहे. यात जिल्हा कृषी अधीक्षक यांनी लक्ष घालून बियाण्याचा झालेला कृत्रिम तुटवडा दूर करून द्यावा अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे. सध्या बाजारात रासी ६५९, प्रभातचे सुप्पर कॉट यासह युएस ७०६७ आणि तसेच कब्बडीच्या एकूण व्हेरायट्याचा मोठ्याप्रमाणात कृषी बाजारात तुटवडा झाल्याचे पहावयास मिळत आहे.
आणखी वाचा-बालभारतीच्या पुस्तकातील संविधान प्रस्तावनेत ‘धर्मनिरपेक्ष’ शब्दाऐवजी ‘पंथनिरपेक्ष’ शब्द, नवा वाद…
लिंकिंगशिवाय कोणत्याच कृषी निविष्ठा मिळत नाही
आम्हाला बियाणे किंवा रासायनिक खत घ्यायचे असेल तर यात मोठ्या प्रमाणात लिकिंगचे बियाणे आणि खत आम्हाला दिले जाते. त्यामुळे आमच्यासारखे रिटेलर आर्थिक अडचणीत सापडतात. यावर कुठेतरी बंधन आले पाहिजेत. आम्हाला ८६४ रुपयात बियाणे छापील किमतीवर घ्यावे लागते. सदर बियाणे आम्ही किती रुपयात विकावे, हा मोठा प्रश्न आहे. मागील आठ दिवसांपासून मी रासीचे केवळ पाच पाकीट मागितले परंतु आद्याप एकही मिळाले नाही. तसेच युरिया खत खरेदी २८५ मध्ये आहे, तर विक्री २६५ मध्ये करावी लागते. तब्बल २० रुपये घट्याने विकावे लागते. शिवाय यातही लिंकिंग आहे, ही मोठी शोकांतिका आहे. -मनोज तगलपल्लेवार, कृषी साहित्य विक्रेता, महागाव.
बियाण्यांसाठी सध्या मोठ्याप्रमाणात फरफट होत आहे. ८६४ रुपयाचे बियाणे तब्बल १५०० रुपयावर ‘ऑन’वर खरेदी केल्या जात आहे. शेतकऱ्याची होणारी ही लूट शासनस्तरावरून थांबली पाहिजे. -विष्णू गावंडे, शेतकरी