महेश बोकडे 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : तुम्ही कृत्रिम दात किंवा क्लिप बसवली असेल तर अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा पाणी पिताना किंवा काही खाताना कृत्रिम दात, क्लिप अन्न नलिकेमार्गे पोटात जाते. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधीताच्या जिवाला धोका संभावतो. नागपूरमध्ये शासकीय रुग्णालयात अशाच प्रकारे वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने ही बाब ऐरणीवर आली आहे.

अनेक जण कृत्रिम दात, क्लिप लावतात. दातांमध्ये सिमेंट वा तत्सम धातू भरले जाते. उपचारानंतर रुग्णांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दंतरोग तज्ज्ञ देतात. परंतु अनेकदा पाणी पिताना किंवा काही खाताना सिमेंटचा तुकडा, कृत्रिम दात, क्लिप निघते व ती अन्न नलिकेमार्गे पोटात जाते. डॉक्टर्स क्ष- किरण तपासणीतून ती कुठे अडकली याचा शोध घेऊन उलटी किंवा तत्सम प्रकाराव्दारे ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. ते शक्य नसेल तर शस्त्रक्रिया, एन्डोस्कोपीव्दारे वस्तू काढली जाते. बऱ्याचवेळा रुग्ण या वस्तू त्यांच्या पोटात गेल्यावरही दुर्लक्ष करतात. परिणामी अनेक दिवस ती शरीरात राहते. त्यातून संसर्ग होण्याचा तसेच अन्ननिलका, आतड्यांना इजा ईजा होऊन जिवालाही धोका संभावतो. त्यामुळे कुठलीही वस्तू अन्न नलीकेमार्गे पोटात गेल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन ती बाहेर काढावी, असे इंडियन डेंटल असोसिएशनच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. वैभव कारेमोरे यांनी सांगितले.

दर्जेदार साहित्य वापरावे

कृत्रिम दात किंवा क्लिप लावताना ते दर्जेदार आहे याची खात्री करावी. हल्ली बाजारात निम्म दर्जाचे कृत्रिम दात व तत्सम वस्तू रुग्णांना दिल्या जातात. त्यामुळे त्या लवकरच निघतात व त्यातून वरील धोका संभावतो, असे इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव कारेमोरे यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artificial teeth clip ingested risk infection old man dies nagpur ysh