नागपूर : जरीपटक्यातील जिंजर मॉलमध्ये ‘रिलॅक्स स्पा द हेअर अॅण्ड ब्युटी’ नावावर सुरू असलेल्या सेक्स रॅकटेवर गुन्हे शाखेने छापा घातला. स्पामध्ये अरुणाचलप्रदेश आणि मणिपूर येथील दोन तरुणी आणि नागपुरातील एका महिलेकडून देहव्यापार करवून घेण्यात येत होता. याप्रकरणी संचालकावर गुन्हे दाखल करून व्यवस्थापक रक्षा उर्फ सना मनीष शुक्ला (२२) रा. रविनगर हिला ताब्यात घेण्यात आले. तीन पीडित युवतींची सुटका करण्यात आली. मात्र, मालक आणि संचालक सापडले नसून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
मानकापूर रहिवासी आरोपी मोहम्मद नासीर भाटी (४८) आणि फिरोज भाटी या दोघा भावंडांनी जरीपटक्यातील जिंजर मॉलमध्ये ‘रिलॅक्स स्पा द हेअर अॅण्ड ब्युटी’ हे दुकान सुरू केले. रक्षा शुक्ला ही तेथे व्यवस्थापक म्हणून काम पाहायची. मालक संचालकांनी मागील दोन महिन्यांपूर्वी परप्रांतातून २६ वर्षांच्या दोन युवती बोलाविल्या. त्यांच्याकडून दोघेही देहव्यवसाय करून घेत होते. याशिवाय नागपुरातील एक विवाहित महिलासुद्धा या देहव्यवसायात आहे. पीडित महिलेला पती आणि दोन मुले आहेत. पती दारूडा असल्याने घर चालवणे कठीण होते. तिची गरज लक्षात घेता आरोपींनी तिला पैशाचे आमिष देऊन देहव्यवसायात ओढले. मागील दोन महिन्यांपासून ती महिला येथे देहव्यवसाय करीत होती. तर परप्रांतिय तरुणी या सहा महिन्यांच्या करार पद्धतीवर देहव्यवसाय करीत होत्या.
हेही वाचा >>>बुलढाण्यात तब्बल पावणेसात लाख मतदारांची मतदानाकडे पाठ; प्रशासन व उमेदवारांचे प्रयत्न व्यर्थ
या प्रकरणाची माहिती गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक कविता इसारकर यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी छापा मारण्यासाठी सापळा रचला. एका बनावट ग्राहकाला पाठविले. सौदा पक्का होताच त्याने इशारा केला. दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने छापा टाकला. त्यावेळी व्यवस्थापक रक्षा शुक्ला आणि तीन पीडित युवती मिळून आल्या. कारवाईची कुणकुण लागल्याने संचालक आधीच फरार झाले. पथकाने रक्षाला ताब्यात घेऊन जरीपटका पोलिसांच्या सुपूर्द केले. पीडितांची सुटका केली. यावेळी आरोपीच्या ताब्यातून महागडा फोन, पाच हजार रुपये रोख असा एकूण ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देेमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निमित गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कविता इसारकर, उपनिरीक्षक महेंद्र थोटे, शेषराव राऊत, अजय पौनीकर, नितीन वासनिक, अश्वीन मांगे, समीर शेख, कुणाल मसराम पूनम शेंडे यांनी केली.