वर्धा : सध्या ‘कोण बनेगा मंत्री’ हीच चर्चा सर्वत्र झडत आहे. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार, शिंदे सेना या बहुमतात असलेल्या व सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असलेल्या पक्षांच्या आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागल्याचे म्हटल्या जाते. वर्धा जिल्ह्यात चारही आमदार भाजपचे निवडून आल्याने मंत्रिपद मिळणारच, अशी खात्री दिल्या जाते. मात्र एका कुटुंबात जिल्ह्याबाहेरील भाजप आमदारास मंत्रीपद मिळण्याची आस आहे.

आर्वी येथील काँग्रेस नेत्या प्रिया शिंदे यांनी आर्वीतून काँग्रेसची तिकीट मिळण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. संभाव्य म्हणून चर्चेत आल्यावर त्यांनी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करीत धमाल उडवून दिली होती. त्यांनी अर्ज सादर केला. पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या सर्व्हेत आपण पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा पण त्या करतात. त्यांचे पती राजू तोडसाम हे आर्णी मतदारसंघातून भाजपतर्फे निवडून आले आहे. यापूर्वी ते २०१४ मध्ये आमदार झाले होते. २०१९ मध्ये भाजपने त्यांना तिकीट नाकारली म्हणून ते अपक्ष उभे झाले होते. त्यात ते पराभूत झालेत. यावेळी तोडसाम निवडून आले. त्यांच्या प्रचारार्थ पत्नी प्रिया शिंदे तोडसाम या महिनाभर आर्णीत तळ ठोकून बसल्याचे त्या सांगतात. त्या म्हणाल्या की नुकतेच मुंबईतून परतलो आहोत. सत्ता स्थापनाची घडामोड पुढे ढकलल्या गेल्याने परत आलो. मंत्रिपदासाठी लॉबिंग वगैरे असे काही केले नाही. पण आहे शक्यता. तोडसाम यांचं मोठं कार्य आहे. आदिवासी समाजात त्यांचा चाहता वर्ग आहे. या समाजाचा चांगला अभ्यास आहे. दुसऱ्यांदा आमदार झाल्याने मंत्रीपद मिळावे, ही अपेक्षा गैर नाही. मंत्रीपद मिळाल्यास आनंदच होईल. पण शेवटी पक्षनेते ठरवतील, असे प्रिया शिंदे तोडसाम यांनी नमूद केले.

हेही वाचा – VIDEO : जेव्हा जगातील सर्वाधिक उंच आणि कमी उंचीची महिला भेटतात…

हेही वाचा – नागपूर : वीज देयकाची थकबाकी मागितल्यावर कर्मचाऱ्याला मारहाण, ग्राहकाने…

भाजप गोटातून कोणाची वर्णी लागणार ही बाब अद्याप उत्सुकतेचीच ठरत आहे. वर्धा जिल्ह्यात चारही आमदार भाजपचेच निवडून आले असल्याने प्रत्येकाचे समर्थक आस लावून बसले आहेत. मुख्यमंत्री कोण, ही बाब पण पेचाची ठरली असल्याच्या चर्चा होत आहे. मात्र मंत्रीपद कळीचा मुद्दा ठरल्याचे लपून नाही. म्हणून आर्वीकरांचा जावई मंत्री होणार का, अशी उत्सुकता व्यक्त होते. प्रिया शिंदे या कट्टर कांग्रेसी. तर आमदार पती भाजपचे. वैचारिक भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी भाजपची सत्ता आल्याचा पतीमुळे त्यांना आनंदच वाटत असल्याचे दिसून येते.