वर्धा : राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी १५ डिसेंबर रविवारी पार पडला. त्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक रामगिरीवर पार पडली. विविध विषय होते. पण एक छोटेखानी विषय पण मंजुरीसाठी आला. तो कायदेशीर तरतुदीच्या निकषात बसत नव्हता. मात्र तरीही विशेष बाब म्हणून त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिलीच. विदर्भातील आर्वीचे संत्रा उत्पादक शेतकरी हे त्याचे लाभार्थी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकरण २०२४ ऑगस्टचे आहे. या काळात मोठ्या प्रमाणात ढगाळी वातावरण दाटून आले होते. त्याचा विपरीत परिणाम संत्रा फळबागांवर झाला होता. बहार गळून पडल्याने संत्रीचे अपेक्षित उत्पादन घटणार, या चिंतेत शेतकरी पडले. जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची बाब आमदार सुमित वानखेडे यांच्यापुढे आली. मात्र ६५ मिमीपेक्षा अधिक वृष्टी झाली तरच नैसर्गिक आपत्तीचा निकष लावून शासन मदत देवू शकते. मात्र तरीही आमदार वानखेडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मदतीचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. तो प्रस्ताव शासनाच्या महसूल व पुनर्वसन खात्याकडे सादर झाला. मात्र ही बाब शासनाच्या अटी, शर्ती, निकषात बसत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. पण मग विशेष बाब म्हणून हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याचे ठरले. बैठकीत विशेष बाब मंजूर झाली. या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी १० कोटी ८४ लक्ष रुपयांची मदत देणे मान्य झाले. त्यानुसार कारंजा तालुक्यातील ३००१, आष्टी तालुक्यातील २६८४ व आर्वी तालुक्यातील २४८ अश्या एकूण ५ हजार ९३३ शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.

हेही वाचा – विदर्भाच्या अनुशेष मोजणीसाठी सत्यशोधन समिती स्थापन करा, मुख्यमंत्र्यांना पत्र

आमदार सुमित वानखेडे म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान मी या संत्रा उत्पादकांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची हमी दिली होती. त्यानंतर सतत संबंधित यंत्रणेसोबत पाठपुरावा सुरू ठेवला. हा प्रस्ताव अखेर विशेष बाब म्हणून मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व शेतकरी आभारी आहेत.

हेही वाचा – बीड, परभणीच्या घटनेवर फडणवीस थेटच बोलले, “तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई…”

आर्वी मतदारसंघात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या लक्षनीय प्रमाणात आहे. येथील संत्री हा नेहमी परिसरात जिव्हाळ्याचा विषय ठरतो. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नेते श्रीधर ठाकरे यांनी संत्री पिकास चांगला भाव मिळावा, त्याची विदेशात निर्यात व्हावी म्हणून सातत्याने प्रयत्न चालविले आहे. मात्र तरीही विविध कारणांनी व प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीमुळे हा संत्री उत्पादक नेहमी निराशेत जात असतो. या संकटात दिलासा म्हणून शासनाच्या मदतीचा हात आवश्यक ठरतो. आता प्रथमच अश्या संकटात शासन मदत घेऊन आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvi farmer orange aid sumit wankhede cabinet proposal devendra fadnavis pmd 64 ssb