वर्धा: नगर परिषदेची शाळा म्हटले की, नाक मुरडण्याची बाब नवी नाही. मात्र एका लहान गावात अशाच शाळेस नावलौकिक मिळवून देतानाच त्याचे रुपडे बदलून ती लक्षवेधी करण्याचा अफलातून प्रयत्न समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्वी येथील ही पालिकेची शिवाजी प्राथमिक शाळा इतिहास ठेवून आहे. मात्र इंग्रजी शाळेच्या लाटेचा फटका या शाळेस पण बसला. पालक, विद्यार्थी फिरकत नव्हते. शाळा बंद होण्याच्या मार्गावर असतानाच एक पाऊल इकडे वळले आणि मंदिरासारखा शाळेचा जणू जीर्णोद्धार झाला. पद्मा चौधरी यांची या शाळेत मुख्याध्यापक म्हणून २०१२ साली येथे रुजू झाल्या. तेव्हा त्या एकट्याच शिक्षिका होत्या. शाळेची वास्तू होती पण विद्यार्थी व शिक्षकच नव्हते. त्यांनी निश्चय केला. पदर खोचून प्रथम शाळेच्या स्वच्छतेची जबाबदारी घेतली. कचऱ्याचा ढीग, पडीत म्हणून दारूचा गुत्ता, गुरं ढोरांचा वावर. पालिका प्रशासनाची मदत घेत ही घाण दूर केली.पालकांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले. त्यांना विश्वास दिला की तुमचा पाल्य मी घडविणार.

नाविन्यपूर्ण उपक्रम

विविध नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केले. पालक त्यात सहभागी झालेत. बदलाचे पाऊल पडत असल्याचे दिसून आल्यावर मॅडमनी विनंती केल्याने आणखी एक शिक्षक मिळाला. वेतनशिवाय कोणतेच अनुदान मिळत नव्हते. पण हार ना मानता स्वतःच्या पगारातून त्यांनी शाळेची रंगरंगोटी केली. जिथे आपणच बसू शकत नाही तिथे विद्यार्थी कसे बसणार, आरोग्यदायी वातावरण हवे, ही त्यांची दृष्टी. घरचे सहकार्य होतेच. पती राजकुमार वाघ हे यवतमाळ येथे शिक्षक. घरी एकटीच मुलगी. तिची आणि शाळेची जबाबदारी पद्माताई यांनी स्वीकारत वाटचाल सुरू केली. प्रयत्नास फळ येत गेले. ३० विद्यार्थी असलेली शाळा आज १२० पटसंख्येवर पोहचली असून १ ते ४ इयत्ता असलेल्या मराठी शाळेतील ही इतकी पटसंख्या असलेली एकमेव शाळा.

थक्क करणारा प्रवास

हा थक्क करणारा प्रवास एका तपात झाला. २०२३ मध्ये या शाळेस पीएम श्री योजनेत सहभागी करून घेण्यात आले. विकासाची तळमळ सार्थकी लागली. शाळेची आकर्षक प्रथमदर्शनी बाजू, हिरवळ, प्रसन्न वर्गखोल्या व त्यात गरीब कुटुंबातील मुलांचा किलबिलाट. आश्चर्य वाटावे असेच.

शाळेचे काम संपत नाही – चौधरी

मॅडम चोधरी म्हणतात की आता पाचव्या वर्गास मान्यता मिळाली आहे. शाळेची पक्की संरक्षक भिंत बांधायची आहे. आणखी काही उपक्रम राबवायचे आहेत. शाळेचं काम कधी संपत नाहीच, अशी भावना त्या व्यक्त करतात. शाळेच्या वेळेपूर्वी एक तास व शाळेची वेळ संपल्यानंतर दोन तास त्या शाळेस देतात. सहकारी शिक्षकांना थांबण्यास सांगता येत नाही. त्या थांबतात कारण पाण्याचा नळ सायंकाळी येतो. शाळेची परसबाग व हिरवळ कायम फुलत राहावी म्हणून तिथे पाणी दिल्यावरच त्या घरी परततात.

आमदारांकडून दखल

अश्याच एका सायंकाळी त्या झाडांना पाणी देत असताना आमदार सुमित वानखेडे हे शाळेपुढून जात होते. या वेळेस पण शिक्षिका शाळेत हजर असल्याचे पाहून चकित झालेल्या वानखेडे यांनी हे दृष्य आपल्या मोबाईलमध्ये क्लिक केली. आमदार वानखेडे म्हणतात मी पाहलेला हा मोठा सार्वजनिक आदर्श आहे. त्यास प्रोत्साहन मिळाले पाहिजे. हवी ती मदत पण करणार. काढलेला फोटो त्यांनी फेसबुकवर टाकला आणि प्रतिक्रियाचा सडाच पडला. शाळा पुन्हा चर्चेत उजळून निघाली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvi shivaji primary school teacher padma chaudhary pmd 64 ssb