खासदार होण्यापूर्वी खासगीत निवडक विश्वासू सहकाऱ्यांशी संवाद साधताना काळे म्हणाले होते की, सुमित आपल्याला पुढे (विधानसभा) निवडणुकीत जड जाणार. म्हणजेच सुमित वानखेडे यांनी चार वर्षांपासून आर्वीत कामाचा झपाटा सुरू केल्याने त्यांच्याशी लढत सोपी ठरणार नाही, याचा कयास ठेवत स्वतः लोकसभा व पत्नीसाठी विधानसभा, असे लक्ष्य काळे यांनी ठेवल्याची कुजबुज सुरू झाली होती. आता वानखेडे यांचा विजय झाल्याने काळे यांचा अंदाज खरा ठरला, असे सत्य मांडल्या जात आहे. पण पत्नी मयुरा काळे यांची उमेदवारी आणताच इतर इच्छुकांच्या नाराजीची चिंता न करणाऱ्या काळे यांना पराभव होऊनही दिलासा आहे. नाईलाज म्हणून खासदारकी स्वीकारली. आता पराभव झाला तरी पुढे खासदारकी सोडून विधानसभा लढण्याचा मार्ग कुटुंबातच उमेदवारी राहिल्याने मोकळा आहे. इतर कोणी असता तर कुटुंब कवच गळून पडले असते. पुढे तिकिटावर दावा करता आला नसता, असा खासदार यांचा डाव राहण्याची शक्यता बोलल्या जाते. मात्र खासदार झाल्याने वाढलेली पक्षाची जबाबदारी ते सांभाळू शकले नसल्याचा ठपका ठेवल्या जात आहे.
हेही वाचा…विजयी जल्लोषात पोलिसालाच धक्काबुक्की, काँग्रेसच्या विजयानंतर अकोल्यात…; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
घरचीच उमेदवारी असल्याने ते उर्वरित पाच मतदारसंघात वेळ देवू शकले नाही. ४० वर्ष ज्या पंजाच्या पुण्याईवर राजकारण यशस्वी केले तो पंजा प्रथम लोकसभा व आता विधानसभा निवडणुकीत गायब केला. सर्वाधिक मतांनी पराभव झाल्याची नाचक्की. लोकसभा निवडणुकीत आर्वीत २० हजार मतांची आघाडी घेणारे काळे ४० हजार मतांनी पराभूत झाले. २० हजार मतांचा खड्डा भरून काढत ४० हजाराचे मताधिक्य घेणाऱ्या सुमित वानखेडे यांनी कारंजा तालुका परिसरात काळे यांना तिसऱ्या क्रमांकावर फेकले. अपक्ष येथे दुसऱ्यास्थानी आहे. आता राष्ट्रवादीकडून लढल्याने काँग्रेस नेते रुष्ट तर पत्नीस पुढे केल्याने राष्ट्रवादी रुष्ट, असा राजकीय आपत्तीचा डोंगर खासदार काळे यांच्यापुढे असल्याचे जिल्हा नेते बोलतात. एक आणखी गमतीदार बाब मांडल्या जाते. काळे यांचे कौटुंबिक जाळे राजकीय घरंदाज आहेत. उमेदवार मयुरा काळे यांचे मामा बाळासाहेब थोरात हे प्रथमच पराभूत झालेत, तर अमर काळे यांचे मामा असलेले ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचा पुत्र सलील पण पराभूत झाले. काळे यांच्या सासुरवाडीचे पालक म्हणून सांगितल्या जाणारे शरद पवार हे पण सत्तेबाहेर व हतबल. यासोबतच खरी चर्चा आहे ती काळे यांचे बोल सत्य ठरल्याची. सुमित जड जाणार, याची.