राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुतीची अधिकृत उमेदवारी अभिजीत अडसूळ यांना जाहीर झाल्यानंतर या निवडणुकीत युतीधर्माचे पालन न करता रमेश बुंदिले हे युवा स्वाभिमान पक्षातर्फे निवडणुकीच्या रिंगणात उभे उतरले. बुंदिले यांच्यावर भाजपने तत्काळ कारवाई करून त्यांची पक्षातून हकालपट्टी देखील केली होती. याची नोंद घेऊन दर्यापूर मतदारसंघातील भाजपसह महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते अभिजीत अडसूळ यांच्या विजयासाठी जिवाचे रान करीत असताना पक्षातून निष्कासित झालेल्या रमेश बुंदिले यांच्या संपर्क कार्यालयावर आणि प्रचार-प्रसार पत्रकांवर भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे आणि माजी खासदार नवनीत राणा यांची छायाचित्रे झळकत होती, यावर आपण आक्षेप नोंदवला होता, असे अरविंद नळकांडे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…वाघोबांचा रास्तारोको…पण, मध्येच एक वाघ उठला आणि पर्यटकांंच्या वाहनाकडे…
एकतर बुंदिले यांच्या कार्यालयावरील फलके आणि पत्रकांवरील भाजपच्या नेत्यांची छायाचित्रे हटविण्याचे आदेश द्यावेत किंवा ती छायाचित्रे प्रसिद्ध करण्याची परवानगी देणाऱ्या तिघाही भाजप नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी निवडणूक प्रचारादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करूनही प्रत्यक्ष कारवाई न झाल्याने महायुती समर्थक मतदारांमध्ये शेवटपर्यंत गोंधळाची परिस्थिती होती आणि त्यामुळेच महायुतीचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांचा पराभव झाला, असे मत अरविंद नळकांडे यांनी व्यक्त केले आहे. अभिजीत अडसूळ यांच्या पराभवास नवनीत राणा, डॉ. अनिल बोंडे आणि प्रकाश भारसाकळे यांची संशयित भूमिका जबाबदार असल्याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध असल्यामुळे या तिघांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करुन योग्य संदेश द्यावा, अशी विनंतीही आपण चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्यक्ष भेटून करणार असल्याची माहिती नळकांडे यांनी दिली आहे.