राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिममधील सभेत बोलताना, महाविकास आघाडीच्या नागपूरमध्ये होणाऱ्या ‘वज्रमूठ’ सभेवरून खोचक टीका केली होती. मविआची ‘वज्रमूठ’ तडा गेलेली आहे, असे ते म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमरावतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – ”…आणि झोपी गेलेला आमदार मनसेमुळे जागा झाला”; बीडीडी चाळ पुनर्विकासावरून मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला
‘वज्रमूठ’ सभेवरून फडणवीसांची खोचक टीका
गुरुवारी वाशिममधील सभेत बोलताना मविआच्या ‘वज्रमूठ’ सभेवरून देवेद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत टीका केली होती. भाजपाची ‘वज्रमूठ’ ही विकासाची ‘वज्रमूठ’ आहे, तर महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ ही तडा गेलेली आहे, असे ते म्हणाले होते. तसेच महाविकास आघाडीची तीन तोंडे तीन वेगळ्या दिशांना आहेत. त्यांचा एक भोंगा सकाळी ९ वाजता वाजतो, दुसरा भोंगा त्याच्या विरुद्ध दुपारी १२ वाजता वाजतो, तर तिसरा भोंगा संध्याकाळी वेगळेच काहीतरी बोलतो. त्यामुळे हे लोक राज्यातील जनतेसाठी काहीही करू शकत नाही, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला होता.
अरविंद सावंतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
फडणवीस यांच्या या टीकेला आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संभाजीनगरमध्ये झालेली दंगल ही केवळ महाविकास आघाडी एकत्र येऊ नये म्हणून घडविण्यात आली होती. आता नागपूरमध्ये आमची ‘वज्रमूठ’ सभा होणार आहे. त्याला भाजपाकडून विरोध होतो आहे. ही सभा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे नेमक्या भेगा कोणाला पडल्या आहेत हे दिसतेय, असे ते म्हणाले. तसेच भाजपाने ‘वज्रमूठ’ सभेचा धसका घेतला असून याच ‘वज्रमुठी’मुळे त्यांची दातखिळी बसेल, अशी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा – “मंगल प्रभात लोढांनी फार लोड घेऊ नये” ‘त्या’ निर्णयावरून सुषमा अंधारेंनी सुनावलं
आदित्य ठाकरेंनीही दिली प्रतिक्रिया
तत्पूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही फडणवीस यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीच्या ‘वज्रमुठी’ला कुठेही भेगा पडलेल्या नाहीत. फडणवीस यांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देऊ नये. देशातील लोकशाही आणि संविधान टिकावे, हाच आमचा उद्देश आहे आणि त्यासाठी आमचा लढा सुरू आहे, असे ते म्हणाले.