भंडारा : तुमसर तालुक्यातील सुकळी (दे) येथे परमात्मा एक सेवक सम्मेलन कार्यक्रमात वितरित करण्यात आलेल्या अन्नातून व येथील विक्रेत्यांकडील पाणी पुरी खाल्ल्याने तब्बल ३० जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर घटनेत २२ रुग्णांनी बेटाळा व देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य सात -आठ जणांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सुट्टी देण्यात आली आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

तुमसर तालुक्यातील सुकळी(दे) येथे दोन दिवसांपूर्वी परमात्मा एक सेवक मानव धर्माचे सेवक सम्मेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम स्थळी सायंकाळी सेवकांना महाप्रसाद वितरीत करण्यात आले होते. तर काहींनी कार्यक्रम स्थळी असलेल्या पाणी पुरी विक्रेत्यांकडील पाणी पुरी खाल्ल्याने सदर पानीपुरी व अन्नातुन तब्बल तीस लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले. परिणामी येथील महिला, पुरुष व लहान बालकांना उलटी, हगवण असे त्रास दुसऱ्या दिवशी सकाळी जाणवल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान येथील विषबाधा झालेल्या रुग्णांना प्रथम बेटाळा व देव्हाडी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र तर काही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.

तेथे त्यांच्यावर योग्य औषधोपचार करुन रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती आहे. सध्य विषबाधा झालेल्या ३० रुग्णाची प्रकृती बरी असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. सदर परमात्मा एक सेवक सम्मेलनात सुकळी येथिल २२ रुग्ण आहेत तर रोहा, आंधळगाव ,जांब व का़ंद्री येथिल सात ते आठ रूग्ण विषबाधेने बाधित झाल्याची माहिती आहे. सदर घटनेची माहिती मिळताच सुकळी येथे बेटाळा व देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय चमु गावात दाखल झाली. येथिल रुग्णाची तपासणी करून योग्य औषधोपचार करण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विषबाधा झालेल्यांची नावे..

कविता डोळस (३४),अक्षय डोळस(१४), निहार बांडेबुचे (१४), श्रेयश ठवकर (५), रियांश ठवकर (८), कौशीक जगनाडे (१९), दिवेश शहारे (१९), भावेश राऊत (८), सुप्रिया नेरकर (१४), प्रिंयाशी राऊत (५), कांता राऊत ( ४५), मनिषा राऊत (४०), संकेत राऊत (८), रेखा राऊत (३२), प्रज्वल भुरे (१४) योगेश शहारे (२१) प्रतीक शहारे (१३), संजय शेंडे (३२), मंगेश शेंडे (२३), वर्षा डोळस (३७), श्रेया डोळस (१४) सतिश मुंडे (१४) सर्व रा.सुकळी व अन्य सात आठ जण रोहा, आंधळगाव, जांब, कांद्री येथिल असल्याची माहिती आहे.

विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये परमात्मा एक सेवक मानव धर्माच्या प्रचारिका व आध्यात्मिक प्रमुख यांची मुलगी व रोहा येथील पाणीपुरी विक्रेत्यांच्या मुलाचा समावेश आली आहे. सदर घटनेने आरोग्य विभाग खळबळून जागा झाला आहे. प. सभापती नरेश ईश्वरकर यांनी विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट घेतली. तसेच देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.आर. रहांगडाले, बेटाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. मिरज शेख यांनीही रुग्णांची भेट घेतली.