अमरावती : जिल्ह्यात गेल्या १८ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत तब्बल सहा वेळा वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीवर आलेल्या रब्बी पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे पाच हजार शेतकऱ्यांची चार हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाल्याचा अंदाज आहे.
सततच्या पावसाने खरीप हंगामात नुकसान झाल्यानंतर रब्बी पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती. पण, गहू, हरभरा, कांदा पिके काढणीवर असतानाच १६ मार्च पासून जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरूवात झाली. अनेक भागात गारपिटीचाही तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे घरांचीही पडझड झाली. या कालावधीत जिल्ह्यात दोन जणांचा आणि १५ जनावरांचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे. एक हजारावर घरांची पडझड झाल्याची नोंद आहे.
हेही वाचा >>> अबब..! ६७ माजी आमदारांना मिळते मासिक ३४.४४ लाख निवृत्ती वेतन
सर्वाधिक नुकसान काढणीवर आलेल्या गहू पिकाचे झाले आहे. वादळामुळे गहू आडवा झाला. काढणीवर आलेला कांदा ओला झाल्याने तो साठवणुकीयोग्य राहिला नाही. संत्र्याच्या आंबिया बहराची फळगळ झाली. केळी बागांचेही वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले. प्रशासनाने ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झालेल्या पिकांसाठी मदतीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. पण, अजूनही मदतीची प्रतीक्षा आहे. तुफान वादळी वारा तसेच विजेच्या कडकडाटसह गारपीट आणि पावसामुळे मंगळवारी सायंकाळी तासभर धुमाकूळ घातला. यामुळे जिल्ह्यातील ३७ घरे व एका गोठ्याची पडझड झाली असून ९२ हेक्टरवरील पिके खराब झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे.
हेही वाचा >>> तारखेच्या आदल्याच दिवशी परीक्षा; ‘सीईटी सेल’चा नागपुरात गोंधळ
अचानक ओढवलेल्या या संकटामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगांव व मंगरुळ दस्तगीर परिसरातील डझनभर गावांना मोठा फटका बसला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाने तयार केलेल्या अहवालात ३७ घरांची अंशत: पडझड झाल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी गुरांच्या एका गोठ्यालाही या अस्मानी संकटाने भुईसपाट केले. अहवालानुसार तीळ, मिरची, कोहळे, भेंडी, मूग, टमाटर, ज्वारी या पिकांनाही गारपीट व वादळी पावसाचा फटका बसला. महसूल प्रशासनाने याबाबतचे पंचनामे केले आहेत. परंतु त्या अहवालात नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, याचा उल्लेख करण्यात आला नाही.
येत्या काळात महसूल, ग्रामविकास आणि कृषी अशा तिन्ही यंत्रणांच्या माध्यमातून संयुक्त पंचनामे पूर्ण केले जातील, त्यानंतरच या नुकसानापोटी द्यावयाच्या मदत रकमेची मागणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सांगण्यात आले.अस्मानी संकटामुळे शेतकरी घायकुतीला आले असून त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीची नुकसान भरपाई हाती यायची असतानाच आता या नुकसानाचे काय ? असा सवाल त्यामुळेच शेतकरी विचारत आहेत.