नागपूर : ओडिशातील सिमिलीपाल या व्याघ्रप्रकल्पात एक-दोन नाही तर तब्बल दहा ‘मेलेनिस्टिक’ वाघांची नोंद करण्यात आली आहे. भारतातील हा एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे, ज्याठिकाणी देशातील सर्वच काळे म्हणजेच ‘मेलेनिस्टिक’ वाघ आहेत. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

जगभरातील एकूण ७५ टक्के वाघ भारतात आहेत. २०२२ च्या व्याघ्रगणनेनुसार देशातील वाघांची संख्या तीन हजार ६८२ इतकी झाली आहे. यात ७८५ वाघांसह मध्यप्रदेश पहिल्या, ५६३ वाघांसह कर्नाटक दुसऱ्या, ५६० वाघांसह उत्तराखंड तिसऱ्या तर ४४४ वाघांसह महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. वास्तविक ओडिशा या व्याघ्रसंख्येच्या जवळही नाही. मात्र, ओडिशातील सिमिलिपाल व्याघ्रप्रकल्प हा एकमेव आहे, ज्याठिकाणी एकूण १६ वाघांपैकी दहा वाघ काळे म्हणजेच ‘मेलेनिस्टिक’ आहेत. या व्याघ्रप्रकल्पाला त्याच्या अनुवंशिक रचनेमुळे एक वेगळे ‘कन्झर्वेशन क्लस्टर’ म्हणून ओळखले जाते.

हेही वाचा – दहावी पास आहात, एस. टी. महामंडळात नोकरीची संधी, अर्ज करा आणि…

हेही वाचा – अनाथांचे नाथ..शंकरबाबांच्या आश्रमाला शरद पवार भेट देणार

गेल्या पाच वर्षांत सिमिलिपाल व्याघ्र प्रकल्पाला वन्यजीव संरक्षण, अधिवास व्यवस्थापन, मानव संसाधन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ३२.७५ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळाले आहे. बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस येथील पर्यावरणशास्त्रज्ञ उमा रामकृष्णन आणि त्यांचे विद्यार्थी विनय सागर यांच्या नेतृत्वाखाली २०२१ मध्ये एक अभ्यास करण्यात आला. ‘ट्रान्समेम्ब्रेन एमिनोपेप्टिडेज क्यू’ या जनुकामुळे वाघाच्या शरीराच्या वरच्या भागाचा रंग गडद होतो. सप्टेंबर २०२१ मध्ये ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’ या शोधपत्रिकेत याबाब एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. या अभ्यासानुसार सिमिलिपाल व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या खूपच वेगळी आहे. इतर वाघांच्या तुलनेत त्यांच्यामध्ये जीन्सचा प्रवाह खूपच मर्यादित आहे. अशा वेगळ्या वाघांची संख्या नामशेष होण्यास अत्यंत संवेदनशील आहे. परिणामी व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही या अभ्यासात संशोधकांनी म्हटले आहे.