नागपूर: नागपूरसह सर्वत्र मध्यंतरी सोने- चांदीचे दर विक्रमी उंचीवर पोहोचले होते. त्यानंतर हे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ७२ हजाराहून खाली आले होते. पण ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजार उघडताच सोन्याच्या दराने उसळी घेतल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांकडून सोने- चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात, हे विशेष.
नागपुरातील सराफा व्यावसायिकांकडे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने- चांदीचे दागिने खरेदीसाठी सकाळपासून ग्राहकांनी गर्दी केली आहे. त्यासाठी अनेक ग्राहकांनी अग्रिम दागिन्यांची नोंदणी केली होती. परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी ते मुहूर्ताला घरी दागिने घेऊन जाण्यासाठी सराफा दुकानात येत आहे. तर बरेच ग्राहक आजच मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी आले आहे. दरम्यान १० मे रोजी सकाळी बाजार उघडल्यावर नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रामसाठी ७२ हजार ८००, २२ कॅरेटसाठी ६७ हजार ७००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ३०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रती किलो ८४ हजार ५०० रुपये होते.
हेही वाचा – नागपुरात वैद्यकीय संस्थेतील अनेक अधिष्ठात्यांवर कारवाई ! काय आहे कारण जाणून घ्या…
हे दर ९ मे रोजी सकाळी २४ कॅरेट सोन्यासाठी प्रती दहा ग्राम ७२ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ५६ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ८०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ८२ हजार ९०० रुपये होते. त्यामुळे एकाच दिवसात सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झालेली दिसत आहे. त्यामुळे मुहूर्तावर सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता जास्त खिसा रिकामा करावा लागणार आहे.
हेही वाचा – चंद्रपूर : एमआयडीसीतील बंद कारखाने बनले असामाजिक तत्त्वांचा अड्डा
गुडीपडव्याच्या दिवशी ९ एप्रिलला नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रामसाठी ७१ हजार ९००, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ९००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ७०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रती किलो ८२ हजार ७०० रुपये होते.