चंद्रपूर: येथील मूल रोडवरील चंद्रपूर फेरो अलॉय प्लांटमधील मागील २५ ते ३० वर्षांपासून कार्यरत स्थायी कर्मचाऱ्यांना औद्योगिक एस १ ग्रेड वेतन लागू करण्याचे न्यायालयाने आदेश दिले असतानाही कंपनी व्यवस्थापनाने अद्यापही सुधारित वेतन लागू केले नाही. त्यामुळे एस-१ वेतनश्रेणी लागू व्हावी, यासाठी सीएफपी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष सूर्यकांत चांदेकर यांनी कामगारांसह फेरो अलॉय प्लांटच्या बॉयलरवर चढून आंदोलन सुरू केले आहे.
स्थायी कामगारांना एस-१ ग्रेड वेतनश्रेणी लागू व्हावी यासाठी कामगारांनी लढा उभारला होता. न्यायालयाने याबाबत तीन वेळा कामगारांच्या बाजूने निर्णय देत एस-१ वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश पारीत केले आहे. मात्र, फेरो अलॉय प्लांट व्यवस्थापन कामगारांना सुधारित वेतन देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे सीएफपी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष सूर्यकांत चांदेकर यांच्या नेतृत्वात सहसचिव माणिक सोयाम, कोषाध्यक्ष महादेव चिकटे, संघटक हेमलाल साहू, विनोद झामरे, मुसाफिर चौहान यांनी प्लांटच्या बॉयलरवर चढून आंदोलन सुरू केले.
हेही वाचा… मनोरंजनाची केवळ एक वस्तू आठ किलोंनी वाढवते तुमचे वजन…
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे. आंदोलनाची बाब कंपनी प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना पाचारण केले.