अकोला : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केलेल्या तपासात १५ वर्षीय मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सतत ओरडत व रागवत असल्याने रागाच्या भरात मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच यमसदनी पाठवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहीगाव गावंडे येथील संगीता राजू रवाळे (४०, रा. ब्राम्हणवाडा जि. वाशीम ह.मु. दहीगाव गावंडे) ही महिला गावातून अन्वी मिर्झापूर मार्गे रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी निघाली होती. अज्ञात व्यक्तीने दगडाने डोके व शरीरावर ठिकठिकाणी वार करून हत्या केली. मृतदेह कुणालाही दिसू नये म्हणून रस्त्याच्या बाजूला नालीमध्ये टाकला व त्यावर काट्या टाकन झाकून ठेवला होता. ६ जून रोजी ग्राम दहीगाव गावंडे शेतशिवारात पुरण काळे यांच्या शेताजवळ महिलेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, २०१ नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला अज्ञात आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने गुन्हा दाखल झाल्यापासून सलग तपास केला.

हेही वाचा – अभियांत्रिकी, फार्मसीसह अन्य बावीस अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १५ जूनपासून

गोपनीय माहितीवरून मृतक महिलेचा मुलगा विधिसंघर्षग्रस्त १५ वर्षीय बालकाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने आईची हत्या केल्याची कबुली दिली. आई आपल्याला सतत ओरडत व रागवत होती, त्यामुळे रागाच्या भरात आपण हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणी पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.