लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ: वैद्यकशास्त्रात रोज नवनवीन संशोधन होत असताना ग्रामीण भागात अद्यापही अघोरी उपायच प्रमाण मानले जात असल्याची संतापजनक घटना घाटंजी तालुक्यात उघडकीस आली. नवजात बालिका सतत रडते म्हणून तिला चक्क बिबा गरम करून बेंबीला लावण्यात आला. या प्रकाराने बालिकेची प्रकृती खालावली. तिला यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

महिलेची प्रसुती ६ जून रोजी घाटंजी तालुक्यातील पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली. आरोग्य केंद्रात चार दिवस आई आणि बाळाची प्रकृती उत्तम होती. दवाखान्यातून सुट्टी झाल्यावर घरी गेल्यानंतरही दोन दिवस नवजात बालिकेला कोणताही त्रास झाला नाही. मात्र त्यानंतर बालिका सतत रडत असल्याने तिचे पोट दुखत असावे, असा आई-वडिलांचा समज झाला.

हेही वाचा… वर्धा: सेवाग्रामच्या डॉक्टरची आत्महत्या; रिधोरा धरणात मृतदेह आढळला

त्यातच गावातील जुन्या जाणत्या मंडळींनी तिला ‘डब्बा’ झाला असावा म्हणून घरगुती उपाय करण्याचा सल्ला दिला. बालिकेच्या आई-वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता घरगुती उपायाचा अघोरी प्रयोग केला. पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर बेंबीला बिबा गरम करून लावला, मात्र हा बिबा उबजला. त्यामुळे बालिकेची प्रकृती बिघडल्याने तिला यवतमाळ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

न्युमोनिया, किडनीवर सूज

या बालिकेला बिब्यायाच्या चटक्यामुळे संसर्ग झाला असून न्युमोनिया झाला आहे आणि किडनीवर सूज आलेली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून शर्थीचे उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ. अजय केशवानी यांनी दिली. या प्रकरणी अद्याप कोणाही विरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली नाही. मात्र, पोलीस या प्रकाराची चौकशी करत असल्याची माहिती पारवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दिली.