नागपूर : राज्यात पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे पोलीस महासंचालक कार्यालायाने पदोन्नतीची प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई आस्थापना विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास ४५० सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय ‘लोकसत्ता’ने वारंवार पुढे आणला होता, हे विशेष.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची उणिव भासू नये म्हणून पोलीस महासंचालक कार्यालयाने तयारी सुरू केली आहे. आस्थापना विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी आदेश काढून एप्रिल महिन्यांतच सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यामध्ये राज्यातील १०३ क्रमांकाच्या तुकडीतील सहायक पोलीस निरीक्षकांना संवर्ग मागण्यात आले होते. त्यानुसार जवळपास साडेचारशेवर सहायक पोलीस निरीक्षकांनी संवर्गपत्र भरून दिले होते. ज्यांना पसंतीक्रमानुसार महसूल विभाग मिळाला नाही, अशा ८६ सहायक निरीक्षकांना चक्राकार पद्धतीने कोकण-२ हा महसूल वर्ग वाटप झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा कोकण-२ विभागासाठी पसंतीक्रम मागविले गेले. त्यामुळे सहायक निरीक्षकांना पदोन्नतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट झाले असून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>अकोला : दूषित पाण्यामुळे ४९ ग्रामस्थांची प्रकृती बिघडली
पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आनंद
पदोन्नतीच्या कक्षेत असूनही सहायक पोलीस अधिकाऱ्यांना अडीच वर्षांपासून पदोन्नती मिळत नव्हती. मात्र, आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीमुळे राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ होणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण १०२ तुकडीचे सहायक पोलीस अधिकारी गेल्या अडीच वर्षांपासून पदोन्नतीच्या कक्षेत होते. मात्र, गृहमंत्रालय आणि महासंचालक कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे पदोन्नतीची प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी थेट न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाली.