वाशिम: एकीकडे खासगी शाळांचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद शाळा अखेरची घटका मोजत आहेत. मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील जिल्हा परिषद शाळेत खोल्याच नसल्याने गावातील संस्थान मध्ये शाळा भरते. त्यामुळे तत्काळ वर्ग खोल्या बांधून देण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी जिल्हा परिषदेत ठिय्या दिला.
मालेगाव तालुक्यातील ग्राम पंचायत डव्हा येथे वर्ग एक ते सातवीचे विद्यार्थी शिकतात. गावातील वर्ग खोल्या जीर्ण झाल्याने त्या निर्लेखीत करण्यात आल्या होत्या. नवीन खोल्यांची मागणी वारंवार करून देखील त्याकडे जिल्हा परिषदेकडून दुर्लक्ष करण्यात आले. वर्ष भरापासून गावातील संस्थान मध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन दिले जात होते.
हेही वाचा… सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; नागपुरातील आजचे दर पहा…
परंतु नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असल्याने नवीन वर्ग खोल्यांची मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषदेत ठिय्या दिला. त्यानंतर जिल्हा परिषदेत त्यांची समजूत घालून योग्य ती कारवाई करण्याचे सांगण्यात आले.