नागपूर: महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने वारंवार महानिर्मितीच्या कोराडी आणि खापरखेडा या दोन्ही वीज निर्मिती केंद्रांना कोळशापातून तयार होणाऱ्या राखेची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहे. परंतु त्याकडे आजही दुर्लक्ष होत आहे. खापरखेडा वीज निर्मिती केंद्राची राख पून्हा कन्हान नदीत आढळली. त्यामुळे पाणी दुषित झाल्याने नागपुरातील पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरसह परिसरात गेल्या एक- दोन दिवसांत  पाऊस झाला. त्यामुळे कन्हान नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. १ जुलैच्या दुपारी कन्हान जल शुद्धीकरण केंद्राच्या (डब्लूटीपी) जलवसाहतीच्या विहिरीजवळ नदीत ओसीडब्लू कंपनीच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख पडलेली आढळली. त्यामुळे अधिकाऱ्यांना धक्काच बसला. ही माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली.

हेही वाचा >>> यवतमाळ : ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी बहिणींची उसळली गर्दी; ढिसाळ नियोजनामुळे सर्वत्र गोंधळ…

दरम्यान अधिकाऱ्यांकडून या राखेचा स्त्रोत शोधण्याचे काम हाती घेतले गेले. त्यात महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या वारेगाव राखेच्या तलाव आणि वारेगाव येथील खासगी राखेपासून तयार होणाऱ्या वीज उत्पादन केंद्रासाठीच्या राख साठवणूक केंद्रातून ही राख नदीत येत असल्याचे स्पष्ट आले. या राखेमुळे नदीतील पाणी दुषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बघत तातडीने खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही राख नदीच्या पाण्यात जाण्यापासून थांबवण्यासाठी आवश्यक उपाय करण्याची विनंती केली गेली. त्यात राखेमुळे कन्हान नदीतील पाणी दुषीत होऊन गंभीर धोके संभावत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. सोबत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ओसीडब्लूकडूनही कन्हान जलशुद्धीकरण प्रकल्प परिसरातही आवश्यक उपाय करण्याचे कामही हाती घेतले गेले. खबरदारी म्हणून राख आढळलेल्या जलवसाहत परिसरातील विहिरीचे पंपही थांबवण्यात आले. त्यामुळे तुर्तास कन्हान नदीतून नागरिकांना केवळ पिण्यायोग्यच पाणी मिळत आहे. सोबत येथील पाण्याची तपासणीही केली जात असल्याचे ओसीडब्लूच्या प्रसिद्धीपत्रकातून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा >>> वर्धा : पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी नव्या फौजदारी कायद्याअंतर्गत दाखल केला पहिला गुन्हा; वकिलाने २८ लाखाने लुबाडले

कन्हान जल शुद्धीकरण केंद्र २५ टक्के क्षमतेवरच सुरू

औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील राखेमुळे कन्हान नदीतील पाणी दुषीत झाले आहे. त्यामुळे कन्हान शुद्धीकरण केंद्र सध्या त्याच्या मूळ क्षमतेच्या दोन तृतीयांश क्षमतेनेच कार्यरत आहे. या अर्धवट पंपिंगमुळे आशी नगर झोन, सतरंजीपुरा झोन, लकडगंज झोन आणि नेहरू नगर झोनचा समावेश असलेल्या कन्हान फीडरच्या मुख्य भागातून पुरवल्या जाणाऱ्या कमांड एरियामध्ये राहणाऱ्या ग्राहकांना कमी पाणीपुरवठा होत असल्याचे ओसीडब्लूचे म्हणने आहे. आवश्यक दुरूस्ती व उपायानंतर हा पुरवठा पूर्ववत होणार असल्याचेही ओसीडब्लूचे म्हणने आहे.

राखेत किरणोत्सर्गाचेही प्रमाण नागपूरसह मध्य भारतातील कोळशात विविध संस्थांच्या तपासणीत किरणोत्सर्गाचे प्रमाण आढळले आहे. त्यामुळे हे किरणोत्सर्गाचे प्रमाण औष्णिक विद्युत केंद्रातील कोळशा जळल्यानंतर तयार होणाऱ्या राखेतही राहते. त्यामुळे ही राख मानवी शरीरात पाणी, श्वास अथवा इतर मार्गातून गेल्यास त्याच्या जीवाला धोका संभावत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणने आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ash of khaparkheda thermal power plants found in kanhan river affecting city water supply mnb