नागपूरात आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांचे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. परंतु शासनाकडून न्याय मिळत नाही. शेवटी आंदोलकांनी नागपुरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयगड या शासकीय निवासस्थानाच्या द्वारावर सोमवारी सकाळपासून ठिय्या देत आंदोलन सुरू केले आहे. मागणी पूर्ण होईस्तोवर उठणार नसल्याचा आंदोलनाचा दावा आहे.
नागपुरात मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी देवगिरी हे दोन शासकीय निवासस्थान आहे. तर अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर त्यांना विजयगड हा बंगला दिला गेला. दरम्यान आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना मानधन वाढीसह इतरही गोष्टींचे आश्वासन दिले. परंतु प्रत्यक्षात शासकीय आदेश निघाला नाही. दरम्यान आदेशाच्या मागणीसाठी नागपुरात गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे.
हेही वाचा >>> Gold Rate in Nagpur : दोनच तासात सोन्याच्या दरात उसळी; ‘हे’ आहेत आजचे दर…
दरम्यान संतप्त आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी सोमवारी अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयगड बंगल्यावर कुच करत ठिय्या आंदोलन सुरू केले. मागणी पूर्ण होऊपर्यंत येथून उठणार नसल्याचा दावाही आंदोलकांनी केला. याप्रसंगी आशा व गटप्रवर्तकांच्या संघटनेच्या मंगला लोखंडे म्हणाल्या, तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना आशा सेविकांना ७ हजार रुपये तर गटप्रवर्तकांना १० हजार रुपये मासिक मानधन वाढीचे आश्वासन देण्यात आले होते. यावेळी २ हजार रुपये भाऊबीज देण्याचेही आश्वासन दिले गेले. परंतु या आश्वासनाची पुर्तता केली जात नाही. हा अध्यादेश काढण्यासाठी नागपुरात सतत आंदोलन सुरू असतांनाही त्याकडे लक्ष दिले जात नाही. दरम्यान सरकार वारंवार मानधन वाढीचे आश्वासन देते. मात्र अध्यादेश काढत नसल्याने आशा स्वयंसेवक व गटप्रवर्तकांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. या विषयावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांची भेट घेतल्यानंतरही मानधन वाढीच्या जाहीर केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. शेवटी नाइलाजाने राज्यातील अर्थ विभागाची जबाबदारी असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागपुरातील शासकीय निवासस्थानासमोर आम्ही आंदोलन करत आहोत. हे आंदोलन आमचे आश्वासन पूर्ण झाल्याशिवाय आम्ही परत घेणार नसल्याचेही लोखंडे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर टीकेचे आसूड, समाजाचे नेते रामदास तडसच असल्याचा तैलिक संघटनेचा ठराव
“आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आशा स्वयंसेवक आणि गटप्रवर्तकांना अनुक्रमे ७ हजार आणि १० हजार मानधन वाढीचे आश्वासन दिले. यावेळी २ हजार रुपये भाऊबीजचेही देणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात जीआर निघाला नसल्याने हाती काहीच मिळाले नाही. त्यातच अजित पवार मला काय आश्वासन दिले हे माहित नसल्याचे सांगतात. त्यामुळे आम्ही आंदोलन करत असून मागणी पूर्ण होईस्तोवर आंदोलन परत घेणार नाही.’’ – मंगला लोखंडे, नेत्या, आशा व गटप्रवर्तक आंदोलक.