नागपूर : आश्वासनानंतरही मागणी पूर्ण केली जात नाही. दुसरीकडे लाडकी बहीण मेळाव्याला राजकीय स्वरूप देण्यासाठी आशांना कार्यक्रमाला हजेरीची सक्ती केली जाते, असा संताप व्यक्त करीत मागण्या मंजूर न झाल्यास लाडकी बहीण मेळाव्यावर बहिष्कार घालण्याचा इशारा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे (सी.आय.टी.यू.) नागपुरातील गुरुदेव सेवाश्रम येथे कार्यकर्ता मेळाव्यात देण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेळाव्यात सुरुवातीला कोलकाता व बदलापूर अत्याचाराचा निषेध करण्यात आला. संघटनेचे नेते राजेंद्र साठे म्हणाले, नागपुरात डेंग्यू – चिकनगुनियाचे रुग्ण वाढले असून महापालिका व जिल्हा परिषद आजार नियंत्रणात कूचकामी ठरली आहे. त्यामुळे आशांवर मोठी जबाबदारी आहे. त्यानंतरही आशा सेविकांना ३१ ऑगस्ट रोजी रेशीमबागमध्ये आयोजित लाडकी बहीण महामेळाव्यामध्ये उपस्थितीसाठी सक्ती केली जात आहे.

हेही वाचा…रामझुला हिट अँड रन प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढला….आता अखेर सीआयडीकडे…

मेळाव्यात सक्तीचा प्रकार अन्यायकारक आहे. कार्यक्रमाला गर्दी दाखवण्याकरिता ही सक्ती आहे. एकीकडे शहरात डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढत असतांना या कामात आशा सेविकांची जबाबदारी जास्त आहे. परंतु त्यांना मेळाव्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याने आशा सेविका व अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. शासनाने आशा सेविकांना मासिक ७ हजार व गटप्रवर्तकांना १० रुपये मानधनाचे आश्वासन दिल्यावरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. दिवाळी बोनससह इतरही आश्वासनाचा पत्ता नाही. त्यामुळे या आश्वासनांची पूर्णपणे अंमलबजावणी करावी अन्यथा आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, असेही साठे म्हणाले. याप्रसंगी प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, लक्ष्मी कोत्तेजवार, अर्चना कोल्हे, अंजू चोपडे, उज्ज्वला कांबळे, सरिता धोटे, मंदा गंधारे, आरती चांभारे उपस्थित होत्या.

लाडकी बहीण मेळावा काय ?

लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये ३१ ऑगस्टला आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा रेशिमबाग मैदानावर होईल. मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्याील दिग्गज नेते उपस्थित राहतील. कार्यक्रमात अनेक बहि‍णींच्या खात्यात योजनेचे पैसेही दिले जाणार आहे. दरम्यान आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे (सी.आय.टी.यू.) सरकारला मागणी पूर्ण न करण्यास बहिष्काराचा इशारा दिल्याने या मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा…स्थानिकांचा विरोध डावलून मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमीपूजन, पटोले यांची टीका

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेत महिलांना दरमहिन्याला दीड हजार रूपये अर्थसहाय्य शासनाकडून मिळणार आहेत. या योजनेसाठी शासनाने अटी व शर्थी निश्चित केल्या असून त्यात बसणाऱ्यांना अर्ज केल्यावर हा लाभ मिळत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asha workers to boycott ladki bahin melava in nagpur over unfulfilled demands mnb 82 psg