विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेल्या तिघांपैकी दोन तरुणांचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू झाला. दोन्ही युवक नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील होते. सचिन शिवाजी कुंभारे (२८, रा. जलालखेडा) आणि विजय सिद्धार्थ सरदार (२७, रा. नारसिंगी) असे मृत तरुणांची नावे आहेत.
जलालखेडा व नारसिंगी येथील तीन युवक आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे गेले होते. रविवारी सकाळी ते रेल्वेने पंढरपुरात पोहचले. आंघोळ करावी व नंतर विठ्ठलाचे दर्शन घ्यावे, असे त्यांनी ठरवले. सचिन आंघोळीसाठी नदीपात्रात उतरला. परंतु, नदीला पाणी जास्त असल्यामुळे सचिनला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी विजयने नदीत उडी घेतली. त्यालाही पोहणे येत नसल्याने तोही पाण्यात बुडू लागला.
दोघेही बुडत असल्याने नदीकाठावर बसलेल्या मित्राने आरडाओरड केला. काही युवकांनी नदी पात्रात उडी घेतली. दोघांना बाहेर काढले व रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.