नागपूर: आमदारांची सुरक्षा कमी केल्याने नाराजी नाही, सुरक्षा कोणाला द्यावी हा सर्वस्वी हा गृह विभागाचा निर्णय असतो, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे विदर्भातील नेते व नियोजन खात्याचे राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना दिली.
गृहखात्याने काही आमदारांच्या सुरक्षेत कपात केली आहे. त्यात शिंदे गटाच्या आमदारांचा समावेश आहे. हा निर्णय फडणवीस यांच्या गृहखात्याने शिंदे यांना दिलेला झटका आहे, असे मानले जाते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी नागपुरात शिंदे गटाचे नेते व राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांना विचारले असता त्यानी या निर्णयामुळे शिंदे गटात कोणतीही नाराजी नाही,असे स्पष्ट केले.ते म्हणाले आमदारांच्या सुरक्षेचा निर्णय गृहखात्याची समिती करीत असते. मागच्या कालखंडात न्यायालयाने काही निर्देश दिले होते. तरी देखील आमदारांनी स्वतःची सुरक्षा नको अशी भूमिका घेतली होती, या सगळ्या बाबतीत गृह विभागाच्या समिती निर्णय घेत असते त्यानुसार तो निर्णय झाला असेल .सुरक्षेचा मूल्यमापन गुणवत्तेवर होतो, तो निर्णय योग्यच असतो. खा.संजय देशमुख यांनी ठाकरे गटाचे आमदार, खासदार फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता.
यावर बोलताना जयस्वाल म्हणाले ‘” देशमुखांनी त्यांच्याकडे पुरावा असेल तर सांगावे , फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे, लोक पळून जात आहे. तर काही ना काही कारण सामोर करतात,मुख्यमंत्री असताना इतके आमदार गेले त्याचे आत्मचिंतन ठाकरे यांनी करावे “
शिंदे यांचा विदर्भ दौरा –
जनतेचे आभार मानण्यासाठी शिंदे येत आहेत, प्रत्येक पार्टी आपला पक्ष वाढवत असतो, प्रत्येकाने आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, आम्ही देखील समाजातील सर्व वर्गात आमचा जनाधार वाढला पाहिजे याचा प्रयत्न करतोय, महायुतीत प्रत्येक पक्षांनी आपली ताकद वाढवली तर महायुती मजबूत होईल.