नागपूर : वनखात्यात कर्तव्यावर असताना भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिली आणि त्यात एका अधिकाऱ्याला एक पाय गमवावा लागला. मात्र, हे दु:ख उराशी न बाळगता आयुष्याला ते सकारात्मकतेने सामोरे गेले. नवी दिल्ली येथे भारतीय सेनेच्यावतीने आयोजित अर्ध मॅराथॉन स्पर्धेत महाराष्ट्रातील बोर व्याघ्रप्रकल्पातील तत्कालीन वनपाल अशोक भानसे यांनी पाच किलोमीटरची मॅराथॉन पूर्ण केली.

कारगिल युद्धातील ऐतिहासिक लष्करी विजयाच्या स्मरणार्थ, भारतीय लष्कराने राष्ट्रीय राजधानी येथे ‘ऑनर रन – इंडियन आर्मी वेटरन्स हाफ मॅरेथॉन’ आयोजित केली. भारतीय सैन्य, दिग्गज आणि जनता, विशेषत: तरुण यांच्यातील बंध मजबूत करणे हा यामागचा उद्देश होता.

हेही वाचा – VIDEO : गुलाबी थंडीची चाहूल आणि ताडोबात वाघांच्या बछड्यांची दंगामस्ती

या स्पर्धेत महाराष्ट्रातील बोर व्याघ्रप्रकल्पातील तत्कालीन वनपाल अशोक भानसे सहभागी झाले होते. १८ ऑक्टोबर २०१८ ला ते कार्यालयीन कामासाठी दुचाकीवरून पवनार येथे जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली. उपचारानंतरही या अपघातामुळे त्यांना एक पाय गमावावा लागला. मात्र, ते एक कर्तव्यतत्पर वनपाल असल्याने कृत्रिम पायाच्या सहाय्याने जंगल आणि वन्यजीवांच्या आव्हानांशी लढण्यासाठी उभे राहिले. शिकारीला आळा घालण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. ते सेवानिवृत्त झाले असले तरीही त्यांनी वने आणि वन्यजीवांप्रती आजही ते तेवढेच कर्तव्यतत्पर आहेत. पाय कापला गेला आणि कृत्रिम पाय लावण्यात आला असला तरीही त्यांनी त्याचा कधी फायदा घेतला नाही. याउलट ते आजही सर्वसामान्यांसारखेच आयुष्य जगत आहेत. आता तर त्यांनी नवी दिल्ली येथे आयोजित मॅराथॉनमध्ये सहभागी होऊन पाच किलोमीटरचे अंतर कापले. त्यामुळे सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

हेही वाचा – राज्यातील पहिला ‘हत्ती कॅम्प’ वनखात्याला नकोसा! हत्ती हलविण्याच्या हालचालींना पुन्हा वेग

ही माझी पहिली मॅराथॉन होती आणि माझ्यासाठी हा खरोखरच अद्भुत अनुभव होता. मी अशा अनेक आश्चर्यकारक लोकांना भेटलो, ज्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळाले. त्यांच्याकडून मला खूप सकारात्मक भावना मिळाल्या. मो. दस्तगीर फसिहुद्दीन आणि मेजर डी. पी. सिंग यांच्यामुळे मला या मॅराथॉनचा भाग बनण्याची संधी मिळाली आणि अप्रतिम अनुभव मिळाला. – अशोक भानसे, सेवानिवृत्त वनपाल

Story img Loader