नागपूर : चिटणीसपुरा चौकात सुरू झालेली दंगल गीतांजली चौकातून पुढे सरकत रात्री साडेअकराच्या सुमारास हंसापुरीपर्यंत पोहोचली. जुना भंडारा मार्गावरील दुकानावर लावलेली सीसीटीव्ही कॅमरे फोडण्यात आले. त्यानंतर दुकानासमोर उभ्या गाड्या जाळल्या. हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले, असे येथील एक दुकानदार अशोक साधनकर यांनी सांगितले.

गीतांजली चौकातून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करीत जमाव हंसापुरी, जुना भंडारा मार्गावर आला. या जमावातील युवकांनी आधी दुकानावर लावलेले सीसीटीव्ही फोडले. संजय मांगलेकर यांच्या दुकानातील सीसीटीव्ही रात्री ११.४७ वाजता फोडण्यात आला. दंगल करणाऱ्या युवकांनी चेहऱ्यांवर कापड बांधले होते. काही युवकांच्या हातात तलवार होती. त्यांनी दुकानासमोरील दुचाकी, चारचाकी पेटवल्या. या भागात सुमारे दहा-पंधरा दुचाकी वाहने जाळण्यात आली. एक दुचाकी जळून राख झाली. सुमारे १०० ते १५० युवक होते. काही युवक गीतांजली चौकात आणि काही युवक कसाबपुरा भागातून जुना भंडारा मार्गावर आले होते. त्यांनी हिंदूच्या दुकानांना लक्ष्य केले. पण जेवणासाठी आलेल्या एका मुस्लीम व्यक्तीची चारचाकी देखील जाळली व ते वाहन रस्त्यावर उलटवले, अशी माहिती संजय मांगलेकर यांनी दिली.

तलवारीने दुकानावर वार

वाहनांचे सिट कव्हर विकण्याचे माझे दुकान आहे. दुकान रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास बंद केले. दंगेखोरांनी दुकानांच्या दारावर तलवारीने वार केला. शेजारचे लोक धावले. त्यामुळे दंगेखोर पळून गेले. त्यांच्या दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहे, असे अशोक साधनकर यांनी सांगितले.

व्यावसायिकांना फटका

संचारबंदीमुळे मोमिनपुऱ्यातील व्यावसायिकांना फटका बसला आहे. मुस्लीम समाजाचे रोजे सुरू आहे. या निमित्ताने बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. संचारबंदीमुळे दुकाने बंद ठेवावे लागले. यामुळे मोठे नुकसान झाले. मोमिनपुऱ्यात शांतता आहे. तातडीने संचारबंदी उठवण्यात यावी, अशी मागणी तयार कापड व्यावसायिक मोहम्मद सलीम यांनी केली.

Story img Loader