बुलढाणा: पितृपक्षासाठी ‘ती’ माहेरी आली… पती अगोदर परतला… दुसऱ्या दिवशी भावासह सासरी निघाली असता रोही च्या रुपात साक्षात काळ आडवा आला अन तिचा करुण अंत झाला.
चिखली तालुक्यातील मलगी – देऊळगावघुबे रस्त्यावर झालेल्या अपघाताची ही करुण कथा! सौ. आश्र्विनी ज्ञानेश्वर जाधव (२२,राहणार मलगी, तालुका चिखली) असे अपघातात ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिला दुचाकीने सासरी सोडायला निघालेला भाऊ गणेश भुसारी (रा.अमोना) हा या विचित्र अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
दोन वर्षांपूर्वीच विवाह झालेली आश्विनी पित्तर साठी माहेरी अमोना येथे आली. सोबत आलेला पती कामामुळे अगोदर परतला. माहेरी थांबलेल्या अश्विनीला सासरी सोडण्यासाठी नात्यातील भाऊ गणेश भुसारी ह दुचाकीने घेऊन निघाला. जात होता. दरम्यान घरून निघाल्यानंतर सासर अवघ्या २ -३ मिनिटांच्या आले असताना काळोना फाट्याजवळ रोह्यांचा एक कळप रस्त्यात आडवा आला.
हेही वाचा… राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली
एका रोह्याने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरून खाली पडल्याने आश्विनीच्या डोक्याला जबर मार लागला. यात तिचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ गणेश भुसारी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शोकाकुल वातावरणात विवाहितेवर सासरी मलगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा… प्रसूतीनंतर अत्यवस्थ तिसऱ्या महिलेचाही मृत्यू; गडचिरोलीत आरोग्य व्यवस्थेची स्थिती गंभीर
पित्तर जेवण्यासाठी पती-पत्नी गेले होते; पती आधी निघून आला. आश्विनी आणि तिचे पती ज्ञानेश्वर जाधव हे पित्तर जेवण्यासाठी अमोना येथे गेले होते. मात्र ज्ञानेश्वर जाधव यांना काम असल्याने ते जेवणानंतर मलगी येथे निघून आले व पत्नीला नंतर यायला सांगितले. दरम्यान काल, सायंकाळी नात्यातील भावासोबत दुचाकीने मलगी येथे येत असताना हा अपघात झाला.