नागपूर : महापालिकेने ४० रस्ते डांबरीकरण कामाचे कार्यादेश काढले. परंतु प्रत्यक्षात डांबरीकरणाऐवजी रस्त्यावरील खड्डे बुजवले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध भागात डांबरी ठिगळ लावलेले रस्ते नागरिकांसाठी त्रासदायक ठरले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कुणाचीही पर्वा करीत नाही, फुटाण्यासारखे फोडू ; आ. बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा

महापालिकेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी शहरातील ४० रस्ते डांबरीकरणाच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. कार्यादेशही काढण्यात आले. मात्र, निवडणुका लांबल्याने महापालिकेत प्रशासक नियुक्त करण्यात आले. सर्व कारभार आयुक्तांच्या हाती आला. त्यांनी डांबरीकरणाला ब्रेक लावला. ज्या रस्त्याचे डांबरीकरण होणार होते. त्याऐवजी त्याच रस्त्यावरील खड्डे डांबरी पॅचवर्कव्दारे भरण्यात येत आहेत. त्यात पुरसे डांबर वापरले जात नसल्याने त्यातील गिट्टी बाहेर पडत आहे. विशेषत: नंदनवन भागातील डांबरी रस्ते अनेक दिवसांपासून खराब झाले असून ठिकठिकाणी त्यावर खड्डे पडले आहे. दिवाळीपूर्वी हे रस्ते तयार केले जाणार होते हे येथे उल्लेखनीय. शहरातील अनेक भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. रस्त्यांत खड्डा की खड्ड्यांत रस्ते अशी अवस्था काही रस्त्यांची आहे.

हेही वाचा >>> नागपूर : मालगाडीचे कपलिंग तुटल्याने दोन गाड्या अडकल्या

दुरुस्तीवर लाखोंचा खर्च

रस्त्यांवर खड्डे अधिक झाल्याने त्यावर डांबरीकरण हा उपाय ठरतो. परंतु, खड्ड़े डांबर टाकून बुजवले तर त्यातील गिट्टी काही दिवसांनी बाहेर पडून पुन्हा खड्डा ‘जैसे थे’ होतो. यामुळे कामासाठी लागलेला लाखोंचा खर्च व्यर्थ ठरतो. सध्या पूर्व, दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम नागपुरात हाच प्रकार सुरू आहे.

झोन अभियंत्यांचे दुर्लक्ष

रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी झोन अभियंत्यावर आहे. कामाची पाहणी त्यांना करायची आहे. ज्या रस्त्यावर खड्डा आहे तो व्यवस्थित खोदून त्यात चांगल्या दर्जाचे डांबर टाकून बुजवला जातो किंवा नाही हे तपासणे आवश्यक आहे. पण सध्या कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत अनून अनेक कंत्राटदारांनी थातूरमातूर कामे करून देयके काढली आहेत. याकडे वरिष्ठांनीच लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asphalt on the roads motorists transport potholes work ysh