वाशीम : अकोला-नांदेड महामार्गावर मालेगाव तालुक्यातील डही-इरळा शेतशिवारात असलेल्या खाजगी डांबर प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या दूषित धुरामुळे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. शेतातील पिकांची वाढ खुंटली असून पिकांची राखरांगोळी होत आहे, तसेच जनावरे आणि मानवांनादेखील विविध त्वचारोगाचे आजार उद्भवत आहेत. याबाबत दैनिक लोकसत्ताने २४ जानेवारी २०२३ रोजी वृत्त प्रकाशित करून प्रश्नाचे लक्ष वेधून घेतले होते. याप्रकरणी प्रदूषण कंट्रोल बोर्डाने कडक कारवाई न करता केवळ समज देण्याचे सोपस्कार पार पाडले. काही दिवस प्लांट बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा सदर प्रकल्प सुरू झाल्याने पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली आहे.

मालेगाव तालुक्यातील डही इरळा शेतशिवारामध्ये खाजगी डांबराचा प्लांट आहे. हा प्लांट शेतीच्या परिसरात असल्याने या प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित धुरामुळे परिसरातील शंभर ते दीडशे एकरातील गहू, हरभरा, तूर, यासह फळ पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. डांबर प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित धुरामुळे पिकांची वाढ खुंटली असून, पिके करपून जात आहेत. तसेच शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील विविध त्वचारोग उद्भवत आहेत. अत्यंत दूषित व दुर्गंधित वासामुळे शेतामध्ये काम करणे त्रासदायक झाले आहे. शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने शेतकरी जीव मुठीत धरून काम करीत आहेत. तरी तो डांबरीकरणाचा प्लांट पूर्णपणे बंद करावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र, याबाबत कुठलीच कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत होता. तसेच सदर डांबर प्लांट बंद करण्याबाबत प्रशासनाकडे वारंवार निवेदने, तक्रारी दिल्या होत्या. परंतु, कुठलीच कारवाई न झाल्याने त्या शेतकऱ्यांनी लोकसत्ताकडे हकीकत मांडली होती.

हेही वाचा – अकोला : लॉकरमधून दागिने काढले अन् काही मिनिटांत गायब झाले..

हेही वाचा – व्यवसायासाठी अर्थसाहाय्य न घेताही बँकेने लावले दुकानास ‘सील’!

सदर प्रकरणी दैनिक लोकसत्ताने २४ जानेवारी २०२३ रोजी वृत्त प्रकाशित करून प्रश्नाचे लक्ष वेधून घेतले होते. याप्रकरणी प्रदूषण कंट्रोल बोर्डाने कडक कारवाई न करता केवळ समज देण्याचे सोपस्कार ९ फेब्रुवारी २०२३ रोजी एका पत्राद्वारे संबंधित डांबर प्लांट मालकास दिले. त्यानंतर काही दिवस डांबर प्लांट बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा सदर डांबर प्लांट सुरू झाल्याने पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे केली.

Story img Loader