सुमित पाकलवार, लोकसत्ता
गडचिरोली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संध्याकाळी भाजपाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. पण यातही गडचिरोली-चिमूरचे नाव नसल्याने महायुतीतील इच्छुक उमेदवारांसह विद्यमान खासदार अशोक नेते व त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. दुसऱ्या यादीत काही जागांच्या बाबतीत जे धक्कातंत्र वापरण्यात आले, तसेच गडचिरोलीबाबतही वापरले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली असून याठिकाणी नवा चेहरा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभेवर महायुतीतील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेव्हापासून दावा केला. तेव्हापासून निर्माण झालेली कोंडी अद्याप फुटलेली नाही. महायुतीत जागांचा तिढा सुटलेला नसल्याने अनेकांचा जीव टांगणीला आहे. बुधवारी भाजपाने दुसरी यादी जाहीर केली, त्यात गडचिरोलीचे नाव नाही. त्यामुळे भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे. मागील दहा वर्षापासून हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे. त्यामुळे यावर भाजपाचा मोठा दावा आहे. परंतु राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी देखील दावा केल्याने पेच निर्माण झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपाला देण्यात आलेल्या यादीत गडचिरोलीचा समावेश आहे. परंतु भाजपा आणि संघपरिवाराकडून ही जागा सोडण्यास विरोध असल्याचे कळते. त्यामुळे शेवटच्या यादीत गडचिरोलीच्या उमेदवाराची घोषणा होऊ शकते. दुसरीकडे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या विरोधात पक्षातील काही नेत्यांच्या तक्रारी होत्या. सोबतच संघपरिवारातून असलेल्या नाराजीमुळे भाजपाकडून नव्या नावाची चाचपणी करण्यात आली. यात डॉ. मिलिंद नरोटे यांना नवा चेहरा म्हणून पुढे करण्यात आले. सद्यःस्थितीत गडचिरोलीसाठी महायुतीकडून तीन प्रमुख दावेदार आहेत. आपल्याला संधी मिळावी यासाठी तिघेही प्रयत्नात आहेत. परंतु नाव जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे राजकीय कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांमध्येदेखील उत्सुकता शिगेला पोचली आहे. त्यामुळे ऐनवेळी भाजपा धक्कातंत्राचा वापर करू शकतो. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आणखी वाचा-“बारामती अजितदादांचीच”, चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “भाजपाला आणखी चार जागा…”
महाविकास आघाडीतील इच्छुक वाढले ?
महायुतीसोबत महाविकासआघाडीतही जागा वाटपाचा तिढा कायम आहे. गडचिरोलीसाठी आजपर्यंत केवळ काँग्रेसमधूनच दावा होता. आता शिवसेना (उबाठा) कडून देखील दावा करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी येथील पदाधिकाऱ्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन गडचिरोली-चिमूरसाठी आग्रह धरला होता. सोबतच काही नाव देखील पुढे केले. यावर उध्दव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कळते. त्यामुळे महाविकास आघाडीतसुध्दा गडचिरोलीसाठी रस्सीखेच दिसून येत आहे.