वर्धा: आपले केस नीटस दिसावे म्हणून महिलाच नव्हे तर पुरुष पण दक्ष असतात.केस पांढरे व्हायला आले तर त्यावर कलप फिरवून ते आकर्षक करण्याची सोय असतेच.त्यासाठी तर आता मोठ्या शहराप्रमाणे लहान गावात पण सुसज्ज केश कर्तनालय सज्ज आहेत.पण तिथे गेल्यावर जर वाईट अनुभव आला तर भांडण व्हायला वेळ लागत नाही.
कारण केसच विद्रूप झाले तर चांगले दिसणार कसे,हा प्रश्न.हिंगणघाट तालुक्यातील नांदगाव येथील कटिंगच्या दुकानात गौतम फुलकर हे केस कापण्यासाठी व दाढी करण्यास पोहचले.मात्र ते झाल्यावर त्यांची केस नीट कापले गेले नसल्याची भावना झाली.त्यातून वाद उद्भवला.तो शिगेवर गेला.आणि त्याच तिरीमिरीत फुलकर हे रमेश आडेवर भिडले.खुर्चीला असलेल्या मान टेकविण्याचा गुटका काढून आडेवर प्रहार केला.त्यात ते चांगलेच जखमी झाल्याने त्यांनी हिंगणघाट पोलीसांकडे धाव घेतली.