डॉ. प्रमोद साळवे यांना गडचिरोली- चातगाव बोदली गावाजवळ गाडी अडवून अपहरण, मारहाण व शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मोठे भाऊ विनोद पटोले यांच्यासह पाच व्यक्तींवर गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले आहेत.
विनोद पटोले, छगन शेडमाके, माजी पोलिस अधिकारी दामदेव मंडलवार, नागपूर येथील सुमित कोठारी अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.
डॉ. प्रमोद साळवे यांची बहीण अल्का रामणे यांच्या नावाने धानोरा तालुक्यातील कटेझरी येथे असलेल्या राइस मिलची खरेदीचा तोंडी व्यवहार ५१ लाख रुपयांत करून रजिस्ट्री करण्याचे ठरवण्यात आले होते.
दरम्यान, विनोद पटोले यांनी टप्प्याटप्प्याने २० लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, सहा महिन्यांची मुदत उलटून गेल्यानंतर त्यांनी मिल व जमिनीबाबत व्यवहार नसल्याने विचारणा केली. परंतु, विनोद पटोले यांच्याकडून सकारात्मक विचार दिसून न आल्याने त्यांना वकिलामार्फत १६ जानेवारीला नोटीस पाठवून व्यवहार करा, अन्यथा रद्द झाला, असे समजण्यात येईल व सौद्यापोटी देण्यात येणारी रक्कमही परत देण्यात येणार नाही, अशा आशयाची नोटीस विनोद पटोले यांना दिली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीच हालचाल करण्यात आली नाही. असे डॉ. साळवे यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी डॉ. साळवे आणि विनोद पटोले यांनी पत्रपरिषदेचा माध्यमातून परस्परांवर गंभीर आरोप लावले आहे. विशेष म्हणजे दोन्ही गट काँग्रेसशी संबंधित आहे.