नागपूर : मध्य नागपुरातील नाईक तलाव परिसरात दोन मतदान केंद्रात काही ईव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे रांगेत लागल्यावरही मतदान होत नसल्याने बरेच मतदान आल्या पावली परतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य नागपूर मतदान केंद्रातील नाईक तलावाजवळील संत कबीर प्राथमिक शाळा केंद्रातील खोली क्रमांक २, ३, ४ येथील ईव्हीएम बंद असल्याची मतदारांची तक्रार आहे. तर या परिसरातील महात्मा फुले शाळेतीलही एक ईव्हीएम बंद होती. यंत्रात बिघाडामुळे मतदानाला उशीर होत असल्याने कष्टकरी वर्गातील बरेच मतदार मतदान न करताच परतले. तर काहींनी नंतर मतदान करण्यासाठी येणार असल्याचे सांगत घरचा रस्ता धरला. हा हलबा बहुल भाग असल्याने अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर यांच्या प्रतिनिधींनी त्यावर तोंडी आक्षेप घेतला. त्यानंतर यंत्रात दुरुस्तीचे काम करून काही ईव्हीएम सुमारे ३० मिनिटं ते १ तासात सुरू झाल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा…आदर्श मतदान केंद्रांचा लूक लक्षवेधी, नागपूरमध्ये ५० विशेष मतदान केंद्र

दरम्यान मध्य नागपूर मतदार संघात यंदा तिरंगी लढत आहे. येथून काँग्रेस पक्षाकडून बंटी शेळके तर भाजपकडून प्रवीण दटके उमेदवार आहे. मुस्लिम व हलबा बहुल असलेल्या या मतदारसंघात पूर्वी काँग्रेसचे अनिस अहमद निवडून येत होते. भाजपने येथून हलबा समाजाचे विकास कुंभारे यांना उमेदवारी देत हलबांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मागील पंधरा वर्षांपासून येथून भाजपचे विकास कुंभारे विजयी होत होते. यंदा भाजपने विकास कुंभारेंना उमेदवारी नाकारत प्रवीण दटकेंना दिली. काँग्रेसनेही बंटी शेळकेंना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसचे पूर्व नगरसेवक रमेश पुणेकर यांना हलबा समाजाने अपक्ष म्हणून उभे करत पूर्ण समाजाची ताकद त्यांच्यामागे उभी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly election 2024 evm at near naik lake in central nagpur polling station are off mnb 82 sud 02