नागपूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार अंतिम टप्प्यात आहे. यंदा पहिल्यांदाच निवडणुकीत आपल्या मताधिक्याचा वापर करणारे १८ आणि १९ वयोगटातील एक लाखाहून अधिक मतदार नागपूर जिल्ह्यात आहे. पहिल्यांदाच लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणाऱ्या या मतदारांना स्वत:कडे खेचण्यासाठी सर्वच पक्षांनी समाजमाध्यमांचा जोरदार वापर केला. त्यामुळे आता हे नवे तरुण मतदार कुणाकडे जातात आणि याचा विधानसभा निवडणुकीच्या परिणामांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या राज्यात मतदान पार पडणार आहे.

नागपूर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी सहा मतदारसंघ शहराच्या सीमेत आहेत तर सहा ग्रामीण भागात आहेत. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४५ लाख २५ हजार ९९७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या १ लाख १ हजार १८२ आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाच्यावतीने सांगण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ४२ लाख ७२ हजार ३६६ मतदार होते. २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या ४१ लाख ७१ हजार ४२० होती. त्यात आता वाढ होऊन ४५ लाख २५हजार ९९७ झाली आहे. वयोगटानुसार बघितले तर ४० ते ५९ वर्षे वयोगटातीलमतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे १७ लाखांच्यावर आहे. 

हेही वाचा >>>भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्‍या बहिणीवर हल्‍ला, राजकीय वर्तुळात खळबळ

सर्वाधिक तरुण नवमतदार पूर्व नागपुरात

नवमतदारांची संख्या बघितली तर पूर्व नागपूर मतदारसंघ यात आघाडीवर आहे. १८-१९ वयोगटातील पूर्व नागपुरात ९ हजार ९१० नवमतदार आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ९ हजार १०८ नवमतदारांसह दक्षिण-पश्चिम नागपूर दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर पश्चिम नागपुरात ८ हजार ३२६ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. उत्तर नागपूर मतदारसंघातही ८ हजार १४ नवमतदार आहेत. सर्वात कमी ७ हजार ८३४ नवमतदार मध्य नागपुरात आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदारयादीत यंदा एकूण २ लाख ५३ हजार ६३१ मतदारांची वाढ झाली आहे. शहरात सर्वाधिक मतदार उत्तर नागपुरात असून ग्रामीणमध्ये कामठी मतदारसंघात आहेत. सर्वच विधानसभा मतदारसंघांत वाढीव मतदारांची नोंद झाल्याने या वाढलेल्या मतदारांचा कुणाला फायदा होतो, याचे गणित राजकीय पक्षांकडून आखले जात आहे.