चंद्रपूर: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँगेस नेते खासदार राहुल गांधी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांपासून तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, डॉली चायवाला या स्टार प्रचारकांनी काँग्रेस, भाजप व अपक्ष उमेदवारांच्या प्रचार सभा गाजविल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाज माध्यमावरील प्रचार तथा घरोघरी मतदारांची भेट घेवून केलेल्या प्रचाराला आज अतिमहत्व प्राप्त झाले आहे. मात्र निवडणुक कुठलीही असो स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा मतदारांचे लक्ष वेधून घेतात. तसेच स्टार प्रचारकांच्या बोलण्याला, त्यांच्या कडून झालेल्या घोषणा व टीकेला महत्त्व असते. त्यामुळे उमेदवार देखील स्टार प्रचारकांची सभा लागावी यासाठी प्रयत्नरत असतात. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत या जिल्ह्यात भाजपचे क्रमांक एकचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमूर येथे भाजप उमेदवार आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रचारसभेला हजेरी लावली. या सभेला लोकांची सर्वाधिक गर्दी होती. चिमूरची सभा तशी पूर्व विदर्भातील भाजपाच्या नऊ उमेदवारांच्या प्रचारासाठी होती. मात्र चिमूर शहरात ही सभा असल्याने भांगडिया यांना त्याचा अधिक लाभ झाला. काँग्रेसचे स्टार प्रचारक खासदार राहुुल गांधी यांनीही चिमूर येथे डॉ.सतिश वारजूरकर यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. या सभेला देखील शहरी व ग्रामीण भागातून लोकांनी गर्दी केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे उमेदवार किशोर जोरगेवार, राजुराचे देवराव भोंगळे व वरोराचे करण देवतळे यांच्यासाठी चंद्रपुरात जाहीर सभा घेतली. शहा यांनी अवघ्या पाच मिनिटात सभा गुंडाळल्याने बहुसंख्य मतदार नाराज झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुर्गापूर येथे मुनगंटीवार तर घुग्घुस येथे जोरगेवार यांच्यासाठी सभा घेतली. चिमूर व ब्रम्हपुरी येथेही त्यांच्या सभा झाल्या. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी चिमूर व ब्रम्हपुरीत सभा घेतली. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी भद्रावतीत तर कन्हैया कुमार यांनी बल्लारपुर येथे संतोष रावत यांच्यासाठी, काँग्रेस नेते खासदार मुकूल वासनिक यांनी काँग्रेस उमेदवार प्रवीण पडवेकर यांच्यासाठी गांधी चौकात सभा घेतली. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काँग्रेससाठी तर आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी भाजपसाठी सभा व रोडशो केला.

हेही वाचा >>>“अनिल देशमुखांनी स्वत:च स्वत:वर हल्ला करुन घेतला”; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाले…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. काँग्रेस महामंत्री के.सी.वेणुगोपाल यांनी बैठक घेतली. खासदार इम्रान प्रतापगडी यांचीही सभा झाली. तर नितेश कराळे यांनी काँग्रेससाठी सभा घेतल्या. नागपुरातील प्रसिध्द डॉली चायवाला याने बल्लारपुरात अपक्ष उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्यासाठी रोड शो घेतला. अभिनेता आफताब शिवदासानी व संजय खापरे यांनी ब्रम्हपुरीत वडेट्टीवारांसाठी रोडशो केला. भाजपाकडून सर्वाधिक स्टार प्रचारकांनी हजेरी लावली. त्यानंतर काँग्रेसचे नेतेही आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly election 2024 nagpur famous dolly chaiwala road show for candidate abhilasha gavture in ballarpur chandrapur news rsj 74 amy