अमरावती : राज्‍यभर मतदानाचा उत्‍साह पहायला मिळत असताना अमरावतीत भाजपच्‍या नेत्‍या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना मोठा दावा केला आहे.राज्‍यात महायुतीची सत्‍ता स्‍थापन होईल आणि भाजपचाच मुख्‍यमंत्री होईल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवनीत राणा म्‍हणाल्‍या, जनतेने महायुतीलाच पसंती दिली आहे. राज्‍यात पुन्‍हा एकदा महायुतीचे सरकार येणार आहे. बडनेरा मतदारसंघातील युवा स्‍वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा हे चौथ्‍यांदा निवडून येतील. जिल्‍ह्यात भाजपच्‍या कमळ या चिन्‍हावरील सर्व उमेदवार निवडून येतील आणि राज्‍यात भाजपचाच मुख्‍यमंत्री पाहायला मिळेल. नवनीत राणा यांनी पत्रकारांशी बोलताना महायुतीतील राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या (अजित पवार) उमेदवार सुलभ खोडके आणि दर्यापूरचे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांची नावे घेण्‍याचे टाळले. अमरावतीतून यावेळी माचीस दिवा पेटवेल आणि दर्यापूरमधून युवा स्‍वाभिमान पक्षाचे रमेश बुंदिले हे निवडून येतील असा दावा त्‍यांनी केला. अमरावतीत भाजपचे बंडखोर उमेदवार जगदीश गुप्‍ता हे माचीस या निवडणूक चिन्‍हावर उभे आहेत. हे विशेष.

हेही वाचा…नागपूर : ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड; व्हेटरनरी कॉलेजमधील मतदान केंद्रावर खोळंबा

नवनीत राणा यांनी सांगितले की, मेळघाटमधून भाजपचे केवलराम काळे, तिवसामधून राजेश वानखडे, धामणगाव रेल्‍वेमधून प्रताप अडसड हे निश्चितपणे निवडून येतील. अमरावती जिल्‍ह्यातील जनतेचा कौल हा महायुतीच्‍या बाजूने आहे. लोक उत्‍साहाने मतदान करीत आहेत. बडनेरात भाजपने रवी राणा यांना पाठिंबा दिला होता. पण, नवनीत राणा यांनी अमरावती आणि दर्यापूर मतदारसंघात महायुतीच्‍या उमेदवारांच्‍या विरोधात प्रचार केल्‍याने त्‍याची चर्चा झाली होती. आज पत्रकारांशी बोलताना त्‍यांनी पुन्‍हा आपला विरोध कायम असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. नवनीत राणा या रवी राणा यांच्‍यासमवेत मोटरसायकलवरून मतदान केंद्रावर पोहचल्‍या.

हेही वाचा…अकोला जिल्ह्यात २९.८७ टक्के, तर वाशीम जिल्ह्यात २९.३१ टक्के मतदान

रवी राणा यांचे सकाळी त्‍यांच्‍या आई सावित्री राणा यांनी औक्षण करून आशीर्वाद दिले. पत्‍नी नवनीत रवी राणा आणि वहिनी सौ. अनुपमा राणा यांनी देखील औक्षण केले. त्यानंतर नवनीत राणा यांच्या सोबत मोटरसायकलने नारायण नगर येथील श्रीराम प्रायमरी स्कूल येथे जाऊन मतदान केंद्रावर रवी राणा यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. त्‍यानंतर बडनेरा मतदारसंघात विविध मतदान केंद्रावर जाऊन रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मतदारांचा उत्साह वाढवला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly election 2024 rana couple on two wheeler to polling station mma 73 sud 02