नागपूर : पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा रविवारी ‘रोड-शो’ झाला. प्रियंका गांधी यांची एक झलक बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तब्बल चार प्रतीक्षा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियंका गांधी यांचा विधानसभा निवडणुकीतील पहिला-वहिला ‘रोड-शो’ रविवारी पश्चिम नागपुरात झाला. हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता सुरू होणार होता. त्यासाठी नागपुरातील नागरिक दुपारी १२ वाजपासूनच अवस्थीनगर चौक परिसरात गोळा झाले होते. कारण, याच ठिकाणाहून रोड-शोचा प्रारंभ होणार होता. या कार्यक्रमापूर्वी त्यांची वडसा, जि. गडचिरोली येथे प्रचारसभा होती. दिल्लीतील धुक्यांमुळे प्रियंका गांधी गांधी सभास्थळी तब्बल दोन तास विलंबाने पोहचल्या. त्यामुळे त्या नागपूर येथील रोड-शोसाठी देखील दोन तास उशिरा पोहोचल्या. मात्र, प्रियंका गांधी यांना बघण्यासाठीचा उत्साह येथील नागरिकांमध्ये कमी झाला नाही. अनेकांनी चार तास प्रतिक्षा केली. प्रियंका गांधी कार्यक्रमस्थळी आल्याचे कळताच काही मिनिटांत चौकात गर्दी उसळली. दरम्यान, प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>>प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..

 दुपारी चार वाजताच्या दरम्यान अवस्थी चौकातून प्रारंभ झाला आणि सुमारे अर्धा तासांपर्यंत सुरू होता. त्यांची सांगता दिनाशॉ फॅक्ट्री चौकात झाली. यावेळी प्रियंका गांधींचे जागो-जागी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत विकास ठाकरे, प्रफुल गुडधे, गिरीष पांडव होते. याशिवाय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री नेते भूपेश बघेल, काँग्रेस नेते मोहन प्रकाश, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी आमदार प्रकाश गजभिये, अनिस अहमद, विशाल मुत्तेमवार सहभागी झाले होते. यावेळी ‘बदलाव की आंधी, राहुल संग प्रियंका गांधी’, विकासजी ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘काँग्रेस पार्टी जिंदाबाद, ‘महाविकास आघाडीचा विजय असो’, अशा घोषणा दिल्या जात होत्या. या रोड-शोमधून काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

प्रियंका गांधी यांना पाहण्यासाठी ‘रोड-शो’च्या मार्गावर दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकजण आपापल्या मोबाईल मधून यात्रेची क्षणचित्रेही टिपत होती. जागो-जागी पुष्पवृष्टी करून प्रियंका गांधींचे स्वागत केले गेले.

हेही वाचा >>>तब्बल १० वर्षांनंतर मधुकर कुकडे यांची भाजपात घरवापासी

बाबासाहेबांची प्रतिमा भेट

दरम्यान, रोड-शोमध्ये ढोल-ताश्याच्या गजरात सुरू झाला. रस्त्यांच्या दुतर्फा लोकांनी गर्दी करून उभे होते. प्रियंका गांधी हसतमुखाने त्यांचे हात उंचावून आणि हातजोडून लोकांचे अभिवादन स्वीकारत होत्या. रोड-शोच्या प्रारंभीची एका व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा प्रियंका गांधी यांना भेट दिली. काहींनी तर वाहनांवर चढून प्रियंका गांधी यांना पुष्पगुच्छ देण्याचा प्रयत्न केला. एका व्यक्तीने निवेदन दिले.

पाच वर्षाच्या चिमुकल्याकडून स्वागत

रोड-शो दरम्यान एका पाच वर्षाच्या चिमुकल्याने पुष्पहार प्रियंका गांधी यांना देऊन त्यांचे स्वागत केले. पालकाने चिमुकल्याला खांद्यावर बसवले आणि त्याच्या हातात पुष्पहार दिला होता. रस्त्यांच्या दुतर्फा लोकांची गर्दी असताना पालकांनी चिमुकल्याकडून प्रियंका गांधी यांचे स्वागत करून लक्ष वेधून घेतले. उंच खुल्या वाहनात प्रियंका गांधी असल्याने त्यांना पुष्पहार घालते शक्य नसल्याने अनेकांनी ते त्यांच्या दिशेने भिरकावले. प्रियंका गांधी देखील पुष्पहार उपस्थितांकडे भिरकावून अभिवादन स्वीकारले.

मुस्लीम महिलांची लक्षणीय उपस्थिती

प्रियका गांधी यांचा रोड-शो अवस्थीनगर चौकातून प्रारंभ झाला. हा संपूर्ण परिसर मुस्लीम बहुल आहे. या चौकातून काही अंतरावर मोठ्या प्रमाणात मुस्लीम महिला प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी उपस्थित होत्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly election 2024 waiting for four hours to see priyanka gandhi by the citizens of nagpur news rbt 74 amy