वर्धा : विधानसभा निवडणुकीत आर्वी भाजपतील बंडखोरी राज्यभर गाजली. अखेर अमित शहा यांच्या दरबारात ती थंडावली, असे येथील विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी अर्ज परत घेतल्यानंतर म्हटल्या गेले. पण सर्व काही सुरळीत नव्हतेच, असे मतदानानंतर आता दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उमेदवारी न दिल्याचा राग दादाराव केचे यांनी काढलाच, असा आरोप सुरू झाला आहे. केचे यांनी आर्वीतील देवेंद्र फडणवीस यांची सभा आटोपल्यावर आपल्या समर्थक मंडळींशी संपर्क सुरू केला. त्यात त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगणे सुरू केले. मतदानाच्या आदल्या दिवशी तर त्यांनी थेट तुतारी नाही तर अन्य कोणी चालवा, असे सांगणे सुरू केले.

हेही वाचा…‘ईव्हीएम’ दुचाकीवरून नेल्‍याच्‍या आरोपानंतर गोंधळ ; गोपालनगर भागात तणाव

एका माजी नगरसेविकेस फोन करून दादाराव केचे यांनी असाच संदेश दिला. तेव्हा तिने केचे यांनाच सुनावून टाकले. तशी माहिती भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना नगरसेविकेने दिली. पण त्याची तत्काळ दखल न घेता उमेदवार वानखेडे व अन्य नेत्यांनी शांत राहून मतदान आटोपण्याची वाट बघितली. रात्री भाजप नेत्यांची सभा बोलावण्यात आली. त्यास दादाराव केचे गैरहजर राहिले. त्यामुळे दादाराव केचेंनी राग कायम ठेवल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दादाराव केचे सर्व काही ठोस हमी मिळूनही असे का वागले, यावर चर्चा झाली. पण वाच्यता न करण्याचे ठरले.

हा असा ठपका ठेवल्या जात असल्याबद्दल विचारणा केल्यावर दादाराव केचे म्हणाले, असे काही घडले नाही. आमचे पक्षातील काही लोक नाहक बदनामी करीत सुटले आहे. महिला नगरसेवक असे काही सांगतात, तर त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. शेवटी मी काही कोणाशी बांधील थोडा आहे?

हेही वाचा…लोकजागर : दुजाभाव कशासाठी?

पक्षातील विरोधक असे बोलत असल्याचे दादाराव केचे यांचे म्हणणे दिसून आले. तर केचे यांना प्रचारात सांभाळून घेण्याची जबाबदारी असलेले व केचेंसोबत अमित शहा भेटीवेळी हजर सुधीर दिवे म्हणाले, हो, अशी कुजबुज ऐकायला मिळत आहे. चौकशी वैगरे करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमचा उमेदवारच निवडून येणार, असे दिवे यांनी स्पष्ट केले. मात्र केचे यांच्याबद्दल कुजबुज असल्याचे स्पष्ट नमूद करीत त्यांनी अप्रत्यक्षपणे अविश्वास व्यक्त करून टाकला. आता असा जाहीर संशयकल्लोळ सुरू झाल्याने पक्ष व केचे पुढील भूमिका काय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly election 2024 wardha bjp mla dadarao ketche accused of doing work against party pmd 64 sud 02