अकोला: देशात चार राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला तीन राज्यांमध्ये मोठे यश मिळाले. मध्य प्रदेशातील भाजप विजयामध्ये अकोला जिल्ह्यातील नेत्यांचा देखील वाटा आहे. जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधींवर मध्य प्रदेशच्या निवडणुकीत प्रचाराची जबाबदारी सोपवली होती. त्याठिकाणचे भाजप उमेदवार विजयी झाले आहेत.
पक्षाच्या दणदणीत विजयाबद्दल अकोला भाजपच्यावतीने रविवारी दुपारी जोरदार जल्लोष केला. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. या निवडणुकीत मराठी व हिंदी भाषिक मतदारसंघांमध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, खामगावचे आमदार आकाश फुंडकर प्रचारासाठी गेले होते. त्याठिकाणी डेरेदाखल होत त्यांनी ठिकठिकाणी प्रचार सभा घेतल्या. त्याचा लाभ भाजप उमेदवारांना झाला असून ते विजयी झाले आहेत. भाजपचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी राजस्थानमधील निवासी, परंतु अकोल्यात स्थायीक असलेल्या मतदारांना राजस्थान विधानसभा निवडणुकीत मतदानाला जाण्यासाठी प्रोत्साहित केले. त्या संबंधित मतदारसंघात देखील भाजप उमेदवारांना लाभ झाला आहे.
दरम्यान, निवडणुकांमधील भाजपच्या यशाबद्दल पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गांधी चौकात मोठा जल्लोष केला. भाजप कार्यालय ते जयप्रकाश नारायण चौकपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताश्यांच्या निनादात जोरदार आतषबाजी करण्यात आली. यावेळी मिठाईचे वाटप करण्यात आले. महिलांनी रांगोळी तसेच फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असून हा विजय हिंदुत्व आणि राम मंदिराला समर्पित आहे, अशी भावना आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केली. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.