बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात महायुतीने सातपैकी सहा जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. मेहकरमधील जागा जिंकून ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात यांनी आघाडीची अब्रू राखली.
मेहकर आणि सिंदखेडराजा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले असून मलकापूर, जळगाव, खामगाव वगळता इतर जागांचे निकाल निसटत्या फरकाने लागले आहे. बुलढाण्यात आघाडीला केवळ ८४१ मतांनी स्वीकारावा लागलेला पराभव आघाडीला मोठा धक्का ठरला आहे. चार जागा जिंकणारा भाजप युतीतील मोठा भाऊ ठरला आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाने प्रत्येकी एक तर राष्ट्रवादी अजितदादा गटाने एक जागी बाजी मारली आहे.
मेहकरमधील लढतीत शिवसेना उबाठा गटाचे सिद्धार्थ खरात यांनी सलग तीनदा विजय मिळविणारे संजय रायमूलकर यांचा पराभव केला आहे. मंत्रालयीन सहसचिव पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेऊन राजकीय आखड्यात उडी घेणारे खरात पहिल्याच लढतीत विजयी आणि जायंट किलर ठरले आहे. त्यांनी १ लाख ४ हजार २४२ मते घेत शिंदे गटाचे संजय रायमूलकर (९९ ४२३ ) यांचा ४८२९ मतांनी पराभव केला आहे.
सिंदखेडराजामध्ये देखील राष्ट्रवादी अजितदादा गटाचे मनोज कायंदे (७२२५६) यांनी मोठा उलतफेर करताना माजी मंत्री राजेंद्र शिंगणे (६७५५३) यांचा ४९९२ मतांनी पराभूत करून राजकीय गोटात खळबळ उडवून दिली आहे. शिंदे गटाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. चिखलीमध्ये भाजपा आमदार श्वेता महाले (१०९२१२) यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे (१०६०११) यांना अस्मान दाखविले. बोन्द्रे ३२०१ मतांनी पराभूत झाले आहे. बुलढाण्यात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (९१६६०) यांनी सलग दुसरा विजय मिळवीत आघाडीच्या जयश्री शेळके (९०८१९) यांचा ८४१ मतांनी निसटता पराभव केला आहे.
मलकापूरमध्ये संचेतींचा महा विजय
सलग सातव्यांदा मलकापूरच्या मैदानात उतरणारे भाजपचे आणि पाचदा आमदार राहिलेले चैनसुख संचेती (१०९९२१) यांनी दणदणीत विजय मिळवीला आहे. त्यांनी काँग्रेसचे आमदार राजेश एकडे ( ८३५२४) यांना चारीमुंड्या चित करीत २६३९७ मतांनी त्यांचा पराभव केला आहे. जळगावमध्ये भाजपचे आमदार संजय कुटे (१०७३१८) यांनी काँग्रेसच्या स्वाती वाकेकर (८८५४७) यांचा १८७७१ मतांनी एकतर्फी पराभव केला. या मतदारसंघातून कुटे यांनी सलग पाचवा विजय मिळविला आहे. खामगावमध्ये आकाश फुंडकर (११०५९९) सलग तिसरा विजय मिळवीत काँग्रेसचे दिलीप सानंदा (८५११२) यांना पराभवाची धूळ चारली आहे. त्यांनी २५ हजार ४७७ मतांनी सहज विजय मिळविला.